‘माजी’ करण्याची भाषा करणाऱ्यांवर शिवसेनेचा जहरी वार; व्यंगचित्रातून गणेश नाईक यांच्यावर निशाणा

महाराष्ट्र

मुंबई: शिवसेना पक्षाने सोशल मीडियावरून वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका करत व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांना लक्ष्य केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने आरोप करणाऱ्या नाईक यांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेने हे व्यंगचित्र प्रसिद्ध केले असून ते सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

गेल्या काही दिवसांपासून गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर आणि निर्णयांवर टीका करत आहेत. त्यांच्या या आरोपांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वीच सणसणीत उत्तर दिले होते. तसेच खासदार नरेश म्हस्के आणि पक्षाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनीही नाईक यांच्यावर सडकून टीका केली होती.

यानंतर आता शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्यंगचित्रात गणेश नाईक यांना ‘खुजे’ दाखवण्यात आले आहे. त्यात ते स्वतःपेक्षा मोठ्या नेत्याला ‘माजी’ करून टाकण्याची भाषा करताना दिसत आहेत. मात्र त्याचवेळी त्यांच्या दोन मुलांकडून “आपणच दोनदा माजी झालात” अशी आठवण करून दिली जात असल्याचे चित्रित करण्यात आले आहे. तसेच त्या दोघांनाही ‘माजी आमदार’ आणि ‘माजी खासदार’ म्हणून दाखवण्यात आले आहे.

हे व्यंगचित्र प्रसिद्ध होताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून समर्थक आणि विरोधकांमध्ये सोशल मीडियावर शब्दयुद्ध रंगले आहे. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.