टिळक नगर येथे डॉ. आंबेडकर जयंती साजरी 

महाराष्ट्र

मुंबई: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान टिळक नगर येथील युगप्रवर्तक बुद्ध विहाराच्या प्रांगणात नुकतेच संपन्न झाले. यावेळी लेखक, कवी अनंत धनसरे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

धर्म,जात आणि राष्ट्र प्रेमाच्या खोट्या संकल्पनांच्या आधारे समाजात दुही माजवली जात आहे. आपले राष्ट्र भौगोलिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक दृष्ट्या टिकविण्याची फार मोठी जबाबदारी भारतीय समाजावर आली आहे, असे प्रतिपादन यावेळी अनंत धनसरे यांनी केले. भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हाच संविधानाच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार महिलांना मिळाला आहे. तेव्हा रक्ताच्या शेवटचा थेंब असेपर्यंत लोकशाहीचे रक्षण आपण केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला केले.

यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष उत्तम केदारे, सरचिटणीस प्रकाश वाघमारे, खजिनदार रामचंद्र हिरे आदी पदाधिकाऱ्यांसह जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. समितीचे कार्यकारी सदस्य दिलीप केदारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.