मुंबई: देशासह राज्यात जातीव्यवस्था वाढत आहे. जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी मराठा समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी प्रबोधन शिबिरे घेऊन सर्वांनी प्रयत्न करायला हवे’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
संस्कृती प्रकाशन संस्थेतर्फे प्रा. उद्धव हरिभाऊ कोळपे लिखित “क्षात्रधर्म व मराठा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष ऍड. शशिकांत पवार अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी महापालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, राष्ट्रवादी कॉंग्रसचे प्रवक्ते विकास लवांदे, अनिल ताडगे, दिग्विजय कोळपे-जाधव, भाऊ मडके, संतोष नानवटे, वैभव साळुंके उपस्थित होते.
लवांदे म्हणाले, “जाती संघटना वाढतच असतील, तर राष्ट्राची बांधणी कशी होणार आणि केव्हा होणार याची चिंता वाटत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.’ डॉ. पवार यांनी जातीव्यवस्था संपवण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले. ज्ञानेश्वर मोळक यांनी मराठा समाजाने जातीव्यवस्था संपवण्यासाठी कृती करावी, असे आवाहन केले. जगजीवन काळे यांनी प्रास्ताविक, मुकुंद काकडे यांनी सूत्रसंचालन केले.