मुंबई: जुन २०२२ हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला, जेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडली. २१ जून २०२२ रोजी विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड पुकारलं, जे शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड ठरल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात या घटनेवर सविस्तर भाष्य करत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले.
फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे पक्षफुटीचं खापर आमच्यावर फोडू शकत नाहीत. त्यांनीच अशी परिस्थिती निर्माण केली, ज्यामुळे एकनाथ शिंदेंना बंड करावं लागलं. शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावान आणि कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांचा पक्ष सोडण्याचा कोणताही इरादा नव्हता. पण उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना नेतृत्वाची जबाबदारी देण्यासाठी शिंदेंच्या अधिकारांवर कुरघोडी करण्यास सुरुवात केली. शिंदेंकडे असलेल्या खात्याच्या बैठकाही आदित्य ठाकरे घेऊ लागले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या युतीमुळे शिंदेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलण्याची मोकळीक मिळत नव्हती. यामुळे शिंदेंच्या महत्त्वाकांक्षेला धक्का बसला आणि त्यांनी बंडाचा निर्णय घेतला.”
फडणवीस यांनी पुढे सांगितलं, “उद्धव ठाकरे यांना हे मान्यच नव्हतं की त्यांचा आमदारांशी संपर्क तुटला होता. त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेला शिंदे आणि इतर आमदार कंटाळले होते. विधान परिषद निवडणुकीदरम्यान शिंदेंना जाणीवपूर्वक बाहेर बसवण्यात आलं आणि एका कन्सल्टंटला मतदानाबाबत सूचना देण्याची जबाबदारी देण्यात आली. हा शिंदेंचा अपमान होता. त्याच दिवशी त्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि त्यांनी बंडाचा निर्णय घेतला.”
शिंदेंनी महाराष्ट्राची सीमा ओलांडल्यानंतर फडणवीसांशी संपर्क साधला. फडणवीस म्हणाले, “शिंदेंनी मला सांगितलं, ‘मी निघालो आहे.’ मी त्यांना आश्वासित केलं की मी त्यांच्या पाठीशी आहे. त्यानंतरच्या घटना सर्वांना माहीत आहेत. शिंदेंनी दाखवलेल्या धैर्यामुळे हे बंड यशस्वी झालं. पहिल्या दिवसापासूनच हे ठरलं होतं की शिंदे मुख्यमंत्री होतील. माझ्या किंवा इतर कुणाच्या मनात दुसरं काही नव्हतं. मी स्वतः सरकारबाहेर राहणार होतो, पण माझ्या पक्षाने मला उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास सांगितलं. त्यामुळे आम्ही एकत्रितपणे स्थिर सरकार चालवू शकलो.” या मुलाखतीत फडणवीस यांनी शिंदे बंडामागील अंतर्गत कारणे आणि त्याचे राजकीय परिणाम स्पष्ट केले, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं पर्व सुरू झालं.