दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

महाराष्ट्र

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत अश्रू, समोर वाळत चाललेली तूर, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई, बहिणीच्या लग्नाची चिंता आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर… पोटच्या लेकरासारखं जपलेलं पीक डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होताना पाहणाऱ्या बळीराजाची ही व्यथा काळीज पिळवटून टाकणारी आहे.

मुख्यमंत्री महोदय, शेतकऱ्यांच्या हातावर ५ हजार रुपये ठेवून त्यांच्या संकटाची तीव्रता कमी होणार आहे का? बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी आणि कर्जाचा डोंगर यांचा हिशेब या तुटपुंज्या मदतीत कसा बसणार? शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू आणि त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता केवळ घोषणांनी दूर होणार नाही.

दुष्काळग्रस्त भागात बांधावर जाऊन पाहणी करण्यासोबतच शेतकऱ्यांच्या पदरात पुरेशी मदत पडेल, असे ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. पीक नुकसानीची योग्य भरपाई, कर्जाचा दिलासा, जनावरांसाठी चारा आणि संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत मिळाली पाहिजे.शेतकऱ्यांना भाषणं नकोत, आश्वासनं नकोत; त्यांना हक्काची आणि पुरेशी मदत हवी आहे!

शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसता येत नसतील, तर निदान त्यांच्या दुःखाची थट्टा तरी करू नका. बळीराजाला सहानुभूतीच्या शब्दांपेक्षा संकटातून बाहेर काढणाऱ्या ठोस कृतीची गरज आहे!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत