वरळीत कचरा अन् दुर्गंधीचे साम्राज्य; शिवसेना ॲक्शन मोडवर, वर्षभर ‘स्वच्छ वरळी’ अभियान

महाराष्ट्र

मुंबई : स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे वरळी परिसरात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचा आरोप करत शिवसेनेने आता स्वच्छता मोहिमेची धुरा हाती घेतली आहे. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानंतर पक्षाचे पदाधिकारी ॲक्शन मोडवर आले असून, मंगळवारी वरळी कोळीवाडा आणि समुद्रकिनारी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘स्वच्छ वरळी, सुंदर वरळी’ या उपक्रमांतर्गत राबवण्यात आलेले हे अभियान केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता वर्षभर सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सचिन अहिर यांनी स्पष्ट केले.

नारळी पौर्णिमेच्या भेटीत नागरिकांनी मांडल्या समस्या

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नारळी पौर्णिमेनिमित्त वरळी कोळीवाड्याला भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला होता. यावेळी नागरिकांनी परिसरातील अस्वच्छता आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर शिंदे यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.त्यानुसार शिवसेनेच्या पथकाने परिसराची पाहणी करून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. समुद्रकिनाऱ्यासह परिसरातील कचरा हटवण्यात आला.

वर्षभराचा विशेष आराखडा

“वरळीतील नागरिक अस्वच्छतेमुळे हैराण झाले आहेत. स्थानिक आमदारांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे,” असा आरोप सचिन अहिर यांनी केला.ते म्हणाले, “आज केवळ समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करून थांबणार नाही. वरळी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी वर्षभराचा विशेष आराखडा तयार करून ही मोहीम सातत्याने राबवली जाईल.”

दोन कोटी नावे वगळली’च्या आरोपावर विरोधकांना टोला

दरम्यान, मतदार याद्यांमधून सुमारे दोन कोटी नावे वगळल्याच्या विरोधकांच्या आरोपांवरही सचिन अहिर यांनी टीका केली. “एसआयआर प्रक्रिया सुरू असताना विरोधकांचे बीएलओ काय करत होते? केवळ बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी या प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहावे. ज्या नागरिकांची नावे वगळली गेली आहेत, ती पुन्हा समाविष्ट करण्यासाठी विरोधकांनी प्रत्यक्ष प्रयत्न करावेत,” असा सल्ला अहिर यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत