औरंगाबाद: स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान (GK) हा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. MPSC, पोलीस भरती, तलाठी तसेच इतर सरकारी परीक्षांमध्ये वारंवार विचारले जाणारे काही महत्त्वाचे बदल आणि माहिती जाणून घेणे आवश्यक असते. अलीकडच्या काळात देशात आणि राज्यात काही जिल्ह्यांची तसेच ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. ही माहिती स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे.
महाराष्ट्रात काही जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव आता छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे, तर उस्मानाबाद जिल्ह्याला धाराशिव असे नाव देण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात आले आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील वेहळे तालुक्याचे नाव बदलून राजगड तालुका करण्यात आले आहे.
अंदमान-निकोबार बेटांमध्येही काही नावांमध्ये बदल करण्यात आले आहेत. पोर्ट ब्लेअरचे नाव श्री विजय पुरम करण्यात आले असून रोज आयसलँडचे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप असे करण्यात आले आहे. नील आयसलँडला शहीद द्वीप आणि हेवलॉक आयसलँडला स्वराज द्वीप असे नवे नाव देण्यात आले आहे.याशिवाय राष्ट्रपती भवनातील काही हॉलची नावेही बदलण्यात आली आहेत. दरबार हॉलचे नाव गणतंत्र मंडप तर अशोक हॉलचे नाव अशोक मंडप करण्यात आले आहे.
भारतातील अभिजात भाषांच्या यादीतही अलीकडेच वाढ झाली आहे. तामिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांनंतर मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भारतातील अभिजात भाषांची एकूण संख्या आता ११ झाली आहे.
घटनात्मक माहितीनुसार, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट तीन वेळा लागू करण्यात आली आहे. तसेच भारतात राष्ट्रीय आणीबाणी १९६२, १९७१ आणि १९७५ या तीन वेळा लागू झाली होती. रुपयाचे अवमूल्यन १९४९, १९६६ आणि १९९१ मध्ये झाले असून देशात नोटबंदीही १९४६, १९७८ आणि २०१६ या तीन वेळा करण्यात आली आहे.
महानगरपालिका संदर्भातील माहितीनुसार, भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका मद्रास (चेन्नई) असून महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका बृहन्मुंबई आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका देखील बृहन्मुंबईच आहे. क्षेत्रफळाने पुणे महानगरपालिका सर्वात मोठी मानली जाते, तर महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका असलेले राज्य म्हणूनही महाराष्ट्र ओळखले जाते. राज्यातील २९ वी महानगरपालिका जालना येथे स्थापन करण्यात आली आहे.स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त मानली जात असून बदललेली नावे व घटनात्मक बाबींची माहिती ठेवणे परीक्षेत यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहे.