दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी; विरोधकांनी मदतीच्या मुद्द्यावर राजकारण करू नये
मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आणि ‘८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण’ हा मूलमंत्र शिवसेना आजही तितक्याच ताकदीने पुढे नेत असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार महाराष्ट्रात कार्यरत असून, समाजकारणाला प्राधान्य देत सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. कार्यकर्ता घरात नव्हे, तर जनतेच्या दारात शोभून दिसतो, ही बाळासाहेबांची शिकवण होती. त्याच विचारातून राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी आणि वेदना जाणून घेत आहेत. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना शक्य ती सर्व मदत केली जात असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
‘जिथे संकट, तिथे शिवसेना आणि जिथे आपत्ती, तिथे शिवसेना’ ही बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण प्रत्यक्ष कृतीतून पुढे नेली जात आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त भागांत जाऊन शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार आणि मंत्र्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही’
शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असा शब्द दिला होता. तो पाळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शासनाच्या वतीने तातडीची पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली असून, शिवसेनेच्या माध्यमातूनही दिवाळी मदत करण्यात आली आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या पाठीशी मदतीचा हात कायम राहील, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, संपूर्ण मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १२ प्रकारच्या सवलती आणि नुकसानभरपाईचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे विरोधकांनी अग्रिम मदतीच्या मुद्द्यावरून राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
ही राजकारण करण्याची वेळ नसून, शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन त्यांचे दुःख दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.यावेळी शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.