पुणे: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत सांत्वन केले. या प्रकरणातील दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश घटनेच्या दिवशीच पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दिल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात आली असून, पीडितेच्या भावंडांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. कुटुंबाच्या मागणीनुसार ‘शबरी आदिवासी घरकुल योजने’अंतर्गत घर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महिला व बाल विकास विभागाच्या ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत १० लाख रुपयांची मदत आज पीडित कुटुंबाच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी कुटुंबीयांना विश्वास देत, या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून दोषीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही दिली.
दरम्यान, घटना घडलेल्या वस्तीवर सुरक्षेच्या दृष्टीने सौर हायमास्ट बसविण्यात येणार असून, परिसरातील नागरिक, विशेषतः महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी मोक्याच्या ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल, असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
“निष्पाप मुलीला न्याय मिळवून देणे आणि पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. न्याय मिळेपर्यंत शासन पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील,” अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली.