हाफकिनचे खासगीकरण होणार नाही; सरकारने सभागृहात दिली हमी

महाराष्ट्र

मुंबई: विधानसभेत हाफकिन संस्थेच्या भवितव्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला थेट सवाल उपस्थित करत संस्थेच्या खासगीकरणाच्या हालचालींवर तीव्र आक्षेप नोंदवला.

वडेट्टीवार यांनी सांगितले की, हाफकिन संस्थेच्या खासगीकरणाचा विषय यापूर्वीही चर्चेत आला होता. सुरुवातीला सरकारने संस्थेची एक इंचही जमीन दिलेली नसल्याचा दावा केला होता. मात्र, नंतर टाटा समूहाला संशोधन केंद्रासाठी पाच एकर जमीन कराराद्वारे देण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने सरकारच्या भूमिकेत विसंगती दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

हाफकिनला त्रिवेणी लस निर्मिती आणि आधुनिक यंत्रसामग्रीसाठी सुमारे १५० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे सरकार सांगत असताना, एवढ्या मर्यादित गुंतवणुकीत संस्था सक्षम होऊ शकते. मग सुमारे १,५०० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर खासगी कंपन्यांची नजर का आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करून संस्थेच्या मालमत्तेचे संरक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली.

हाफकिनसारखी ऐतिहासिक आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची संस्था खासगीकरणाच्या मार्गावर नेली जाणार नाही, याची स्पष्ट हमी सरकारने सभागृहात द्यावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

यावर उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी हाफकिन संस्थेचे खासगीकरण केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी आणि आमदारांची बैठक लवकरच आयोजित करून संस्थेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक उपाययोजना ठरवण्यात येतील, असे आश्वासन सभागृहात देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत