युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के दराने वाढतेय; एकनाथ शिंदे

महाराष्ट्र

ठाणे : जगातील अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना आणि त्याचा विविध अर्थव्यवस्थांवर परिणाम होत असतानाही भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के जीडीपी वाढीसह मजबूतपणे पुढे जात आहे. ही देशाच्या आर्थिक प्रगतीची आणि स्थैर्याची सकारात्मक बाब असून, ‘विकसित भारत २०४७’च्या संकल्पाच्या दिशेने भारताने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे. पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी देशाची वाटचाल सुरू असून, या प्रवासात महाराष्ट्र सरकारही मोठे योगदान देईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

जगातील काही देशांमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. युद्धजन्य परिस्थितीचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर मोठा परिणाम झाला आहे. अशा प्रतिकूल जागतिक परिस्थितीत भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के दराने वाढत असल्याचे चित्र आश्वासक आहे. भारताची आर्थिक ताकद वाढत असल्याचा हा महत्त्वाचा संकेत असल्याचे शिंदे म्हणाले.

देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत असताना त्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाने बाळगला पाहिजे. मात्र, देशाच्या प्रगतीचे अभिनंदन करण्याऐवजी विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील राजकीय आकसापोटी देशाच्या प्रगतीकडेही नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जात असल्याची टीका शिंदे यांनी केली.

पंतप्रधानांकडून नागरिकांना करण्यात येणारे आवाहन हे देशाच्या हितासाठी, उत्थानासाठी आणि प्रगतीसाठी असते. मात्र, विरोधक या आवाहनांकडेही राजकीय दृष्टिकोनातून पाहत असल्याचे ते म्हणाले. देशाची प्रगती होत असताना त्यावर टीका करण्याऐवजी ती आणखी वेगाने कशी होईल, यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

‘विकसित भारत २०४७’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांना महाराष्ट्र सरकारकडून पूर्ण सहकार्य केले जाईल. देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राची भूमिका आणखी बळकट केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारताची आर्थिक प्रगती ही केवळ सरकारची नव्हे, तर १४० कोटी भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. देशाच्या प्रगतीला विरोध करणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत