विवेक भावसार यांना न्यायालयाची राईट वॉटर प्रकरणी मनाई

महाराष्ट्र

भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांना दिलासा

मुंबई: नागपूरस्थित राईट वॉटर सोल्युशन्स या कंपनीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते व महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांच्यामुळे लाभ झाला अशा बदनामीकारक बातम्या ताबडतोब वेबसाईटवरून हटवाव्यात आणि कंपनीविरोधात कोणताही मजकूर प्रकाशित करू नये, अशा स्वरुपाचा मनाई आदेश नागपूरमधील न्यायालयाने द न्यूज 21 डॉट कॉम आणि द राजकारण डॉट कॉम या वेबसाईटचे संपादक विवेक भावसार यांना बुधवारी दिला. यामुळे मा. विश्वास पाठक यांना दिलासा मिळाला आहे.

मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत निवडक कंत्राटदारांना पंप बसविण्याची कामे मिळाली असून त्या कंपन्यांपैकी एक असलेल्या राईट वॉटर या कंपनीस मा. विश्वास पाठक यांच्यामुळे लाभ झाल्याचा दावा करणाऱ्या बातम्या विवेक भावसार यांनी त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या होत्या. ट्वीटर व व्हॉट्स ॲपवरून त्याला अधिक प्रसिद्धी दिली होती. या बदनामीच्या विरोधात राईट वॉटरने नागपूरमधील न्यायालयात धाव घेतली. मा. विश्वास पाठक यांचे राईट वॉटरमध्ये अल्प समभाग असून त्यांचा कंपनीच्या दैनंदिन कामाशी काही संबंध नाही, राईट वॉटरला महावितरणच्या टेंडर प्रक्रियेतून स्पर्धात्मक व पारदर्शी पद्धतीने पंप बसविण्याची कामे मिळाली आहेत व महावितरणच्या संचालक मंडळात राईट वॉटरविषयी निर्णय होत असताना मा. विश्वास पाठक त्या निर्णयप्रक्रियेपासून दूर राहिले होते, असे मुद्दे राईट वॉटरने मांडले. या याचिकेची दखल घेऊन जॉईंट सिव्हिल जज (सिनिअर डिव्हिजन) न्या. आनंद करभाजन यांनी विवेक भावसार यांच्याविरोधात मनाई हुकूम बजावला.

न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे की, राईट वॉटरच्या संदर्भातील चार बातम्या प्रसिद्ध करण्यास, पुन्हा प्रसिद्ध करण्यास, वितरित करण्यास अथवा कोणत्याही प्रकारे उपलब्ध करण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच कंपनीच्या विरोधातील कोणत्याही स्वरुपातील बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यास तात्पुरती मनाई करण्यात येत आहे.

आदेशात असेही म्हटले आहे की, या प्रकरणी पुढील सुनावणी होईपर्यंत विवेक भावसार आणि वेबसाईटची प्रकाशक कंपनी कल्पक डिजिटल मीडिया यांनी संबंधित बातम्या आपल्या वेबसाईटवरून हटवाव्यात तसेच त्यांच्या नियंत्रणातील सर्व सोशल मीडिया हँडल्स आणि अन्य प्लॅटफॉर्मवरूनही हटवाव्यात.

आदेशात टिप्पणी करण्यात आली आहे की, या बातम्यांमधील छायाचित्रे व शब्दांकन ध्यानात घेता असे दिसते की, त्या अपुऱ्या माहितीवर आधारित आहेत तसेच त्यामध्ये राईट वॉटरने दिलेल्या नोटिशीला उत्तरही दिलेले नसून कंपनी यशस्वी झालेल्या निविदा प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या व असंतोष निर्माण करणाऱ्या आहेत. अपुऱ्या माहितीवर आधारित या वृत्तलेखांमुळे कंपनीचा लौकिक धोक्यात आला आहे व त्यामुळे न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक आहे.

मा. विश्वास पाठक यांनी सांगितले, “न्यायालयाने राईट वॉटर कंपनीबाबत विवेक भावसार यांना मनाई हुकूम दिल्याबद्दल आपण समाधानी आहोत. नागपूरमधील एक मराठी तरूण पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणारा उद्योग उभा करत असल्याने मी या कंपनीत अनेक वर्षांपूर्वी छोटी गुंतवणूक केली होती. सौर कृषिपंप बसविणाऱ्या अनेक कंपन्यांपैकी केवळ राईट वॉटर कंपनीला टार्गेट करून त्या आधारे कंपनीसोबत माझीही बदनामी करण्यात येत होती. न्यायालयाच्या पुढील सुनावणीत सत्य समाजासमोर येईल व बदनामी करणाऱ्या संबंधितांना शिक्षा होईल, अशी मला आशा आहे.”

विवेक भावसार यांनी राईट वॉटरविषयी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यास न्यायालयाने मनाई केली असून संबंधित बातम्या हटविण्यास सांगितले आहे. अन्य कोणी या बातम्यांना अथवा तशा मजकुराला वृत्तपत्रे, वेबसाईट, व्हॉट्सॲप इत्यादी सोशल मीडियावर प्रसिद्धी दिली तर त्यामुळेही न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होईल. त्यामुळे पत्रकार मित्रांनी या बाबतीत काळजी घ्यावी, असे आवाहन विश्वास पाठक यांनी केले.