लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाचा खून; मालाड रेल्वे स्थानकावर थरार

महाराष्ट्र

मुंबई: मुंबईची लाइफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी आता जीवघेणी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गर्दीमधून होणारे वाद, धक्काबुक्की ही बाब नवी नाही; मात्र याच वादातून एका प्रवाशाचा खून झाल्याची धक्कादायक घटना मालाड रेल्वे स्थानकावर घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ जानेवारी रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ही घटना घडली. लोकलमधील किरकोळ वादाचे रुपांतर थेट हाणामारीत झाले आणि त्यातून एका प्रवाशाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला.

या घटनेत अलोक सिंग असे मृत प्रवाशाचे नाव आहे. लोकलमधून उतरण्याच्या कारणावरून अलोक सिंग यांचा दुसऱ्या एका प्रवाशासोबत वाद झाला होता. हा वाद वाढत जाऊन दोघांमध्ये झटापट झाली. लोकल मालाड स्थानकावर थांबताच संबंधित प्रवाशाने आपल्या जवळ असलेल्या धारदार शस्त्राने अलोक सिंग यांच्या पोटात वार केला.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी अवस्थेत अलोक सिंग रक्ताच्या थारोळ्यात प्लॅटफॉर्मवर कोसळले. हल्ला करणारा आरोपी प्रवासी घटनास्थळावरून फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अलोक सिंग यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, रेल्वे पोलिसांनी मालाड रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकलमधील वाढती गर्दी, प्रवाशांमधील संयमाचा अभाव आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.