नागपूर: समृद्धी महामार्गावर काँग्रेसच्या नगरसेवकाची बस थांबवून त्यांना धमकावण्यात आले, हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी चाकू,तलवार, बंदूक असल्याची माहिती मिळाली पोलिस या प्रकरणी तपास करत असल्याची माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी दिली.
समृद्धी महामार्गावर घडलेल्या प्रकरणी कोण होत, कोणी हल्ला केला याबाबत अधिकची माहिती नाही पण पोलिस याबाबत तपास करत असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलें.बारामती इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वडेट्टीवार यांनी वाहिली. या विमान अपघाता बाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे, लोकांच्या मनात शंका आहे. त्यामुळे सीआयडी चौकशीपेक्षा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र यावेत का? त्या पक्षात कुणाला मंत्रिपद, उपमुख्यमंत्री पद द्यावे हा त्यांचा निर्णय आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वय पाहता मतभेद बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र यावे अशी भावना वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
येत्या अधिवेशनात विरोधी पक्ष नेते पदाबाबत सरकार नवीन विधेयक आणणार आहे. या विधेयकाला वडेट्टीवार यांनी विरोध करत याची काय गरज आहे असा सवाल उपस्थित केला. राज्यात उपमुख्यमंत्री पद आहे जे संवैधानिक नाही पण विरोधी पक्ष नेते पद द्यायचे नाही म्हणून सरकार पळवाटा शोधत आहे. सरकारला हवे तसा कारभार करायचा आहे, विरोध नको म्हणून हे विधेयक आणले जात आहे ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.
जिल्हा परिषद निवडणूक आणि TET परीक्षेच्या तारखा एकच दिवशी आल्या आहेत. यामुळे शिक्षकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.राज्य सरकार आणि निवडणुकीत आयोगात समन्वय नाहीये का? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी विचारला. शिक्षकांना असे वेठीस धरणे हा त्यांचा छळ आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी नागपुरात बोलताना केली.