काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘प्रतिभा शोध’ अभियानात सहभागी व्हा; हरी शंकर गुप्ता

महाराष्ट्र

मुंबई: काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी आणि काँग्रेसचा विचार, इतिहास, लोकशाही व संविधानवादी मूल्ये तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाच्या वतीने ‘प्रतिभा शोध’ (Talent Hunt) अभियान सुरू करण्यात आले आहे. राज्यातील सर्व स्तरांतील लोकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दिल्लीचे माजी आमदार व या अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी हरी शंकर गुप्ता यांनी केले आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना हरी शंकर गुप्ता म्हणाले की, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अनेक विषयांवर उत्तम ज्ञान असलेली प्रतिभावंत माणसे आहेत. अशा लोकांना काँग्रेस पक्षाशी जोडण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे. या अभियानातून निवड झालेल्यांना संशोधन विश्लेषक, प्रवक्ते तसेच काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागात काम करण्याची संधी दिली जाणार आहे.

हे अभियान तीन टप्प्यांत राबवले जाणार असून इच्छुक उमेदवारांनी १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. त्यानंतर अर्जांची छाननी करून काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पत्रकार, इतिहासतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची समिती उमेदवारांच्या मुलाखती घेईल. अंतिम निवड अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमार्फत केली जाणार आहे. देशभरात हे अभियान सुरू असून उत्तर प्रदेशातून ५५०, जम्मू-काश्मीरमधून १०० तर झारखंड व ओडिशामधूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, अनेकांना राजकारणात येण्याची इच्छा असते, मात्र योग्य मार्ग मिळत नाही. समाजातील प्रतिभावंत लोकांना संधी देण्यासाठी काँग्रेस पक्षाने हा पारदर्शक उपक्रम सुरू केला आहे. लवकरच राज्याच्या सहाही विभागांत पत्रकार परिषद घेऊन या अभियानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

आर्थिक सर्वेक्षणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अतुल लोंढे म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था डबघाईला गेल्याचे चित्र आर्थिक सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रम अपयशी ठरला असून आयात वाढली आहे. राज्य सरकारांवर कर्जाचा बोजा वाढत असून विकास योजनांवरील खर्चात कपात करावी लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस उपस्थित होते.