बारामती: ह्या मुलुखाची चिठ्ठी पर मुलुखातील आपल्या प्रियजणांपर्यंत पोहोचवणाऱ्या पोस्टमनची समाजाने पूर्वी पासून दखल घेतली. पोस्टमनच्या दैनंदिन आयुष्यावर प्रकाश टाकणारे अनेक सिनेमे, माहितीपट, मालिका निघाल्या. ज्यातून पोस्टमन घराघरांत पोहोचला. पण त्याच्याप्रमाणेच प्रकाशरुपी आनंद नित्यनेमाने देणारा ‘लाईनमन’ मात्र आजवर दुर्लक्षित राहिला होता.
लाईट गेल्याशिवाय लाईटची किंमत कळत नाही असे म्हणतात. पण लाईट येऊनही ती कुणामुळे आली हे कुणी जाणून न घेतल्याने ‘तो’ कायम दुर्लक्षितच राहतो. कारण विजेचा धंदा हा तसा जोखमीचा. त्यामुळे कामातली चूक एखाद्याला जिवानीशी चुकवावी लागते. इथे जर-तर, चर्चा, हुशारी काही कामाची नसते. प्रत्येक कामात तितकीच जोखीम असते. इतके असूनही ‘लाईनमन’च्या आयुष्यावर आजवर कोणी ‘प्रकाश’ टाकलेला नाही. मात्र केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने यावर्षीपासून ४ मार्च हा दिवस संपूर्ण देशभर ‘लाईनमन दिवस’ म्हणून साजरा करण्याचे निर्देशित केले आहे. या दिवसामुळे का होईना लाईनमन समाजाला समजेल आणि समाजही त्याला समजून घेईन.
मुंबईतला काही भाग वगळला तर सबंध महाराष्ट्राला वीज रुपी ऊर्जा पुरविण्याचे काम महावितरण ही सरकारी कंपनी करत आहे. नैसर्गिक आपत्ती, सामाजिक विरोध पत्करुन या कंपनीला कायम कार्यरत राहावे लागते. ग्राहक म्हणून आपल्याला कंपनीकडून अखंडितपणे वीज हवी असते. अगदी २४ तासांत एका मिनिटाचा जर खंड पडला तरी वीज यंत्रणेला टिकेचा धनी व्हावे लागते. पण ती यंत्रणा तुम्ही-आम्ही समजून घेत नाहीत. गेलेली वीज कोणीतरी रात्री-अपरात्री पोलवर झालेला बिघाड दुरुस्त केल्याशिवाय येत नाही. हा वायरचा उद्योग आहे.
वायरलेसप्रमाणे याकडे पाहणे चुकीचे ठरेल. महावितरणचा विचार केला तर एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जवळपास ८० टक्के कर्मचारी हे विजेच्या कामात थेट सामावलेले आहेत. ग्राहकाच्या मीटरपर्यंत वीज पोहोचविण्याचे काम प्रमुखत: लाईनमनरुपी कर्मचारी करत असतो. पदोन्नती आदी कारणांमुळे वीज कर्मचारी कंपनीत वेगवेगळ्या नावाने ओळखले जात असले तरी समाजासाठी तो फक्त लाईनमनच असतो.
६० च्या दशकात वीज प्रत्येकापर्यंत पोहाचलेली नव्हती. याउलट आज वीज नसलेलं घर शोधावं लागेल. महावितरणची ग्राहकसंख्या २ कोटी ९२ लाख असून, विजेचा वापर १ लाख २२ हजार दशलक्ष युनीटच्यावर पोहोचला आहे. रक्तवाहिन्यांप्रमाणे पसरलेलं हे विजेचे जाळे ११ लाख किलोमीटरचं झालंय. ४०९४ उपकेंद्रातून राज्याला २५ हजार मेगावॅट वीज पोहोचवण्याचं अखंड काम महावितरणचे हे लाईनमन अविरत करत आहेत. या अवाढव्य पसरलेल्या यंत्रणेची नियमित देखभाल, दुरुस्ती करण्याचे काम महावितरणचे ८१ हजार ७०९ कर्मचारी करतात. या जोखमीच्या कामात अनेकांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे तर शेकडो लाईनमन आजवर जायबंदी झालेत. आता या क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून ‘लाईनवुमन’ची भरती झाली आहे.
महिला असुनही त्या पुरुष कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने काम करत आहेत. या लाईनमन दिनाच्या निमित्ताने किमान यापुढे तरी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता तुमच्या-आमच्यासाठी काम करणाऱ्या लाईनमनला, त्याच्या कामाला प्रतिष्ठा मिळेल, ही आशा आहे. त्यांच्या या कामात त्यांनी सुरक्षेचा अवलंब करावा, स्वत: च्या आयुष्याची काळजी घेऊन ह्या महाराष्ट्राला आणखी ऊर्जावान राज्य बनवावे, ह्याच शुभेच्छा
विकास पुरी
जनसंपर्क अधिकारी
महावितरण, बारामती परिमंडल