पुणे: बिबवेवाडी परिसरात सोमवारी (ता. २) मध्यरात्री दुचाकीला उभ्या टेम्पोची पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. अक्षय अजित बोथरा (वय ३५, रा. विष्णू कॉम्प्लेक्स, सिंहगड रस्ता) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिस अंमलदार भागीनाथ पवार यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय बोथरा हे सोमवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास बिबवेवाडीतून अप्पर इंदिरानगरच्या दिशेने दुचाकीवरून जात होते.
ईएसआयसी रुग्णालयासमोर त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला दुचाकीची पाठीमागून धडक बसली. या अपघातात अक्षय बोथरा खाली पडले असून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची नोंद बिबवेवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.