शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; २० लाख विद्यार्थ्यांची होणार मोफत नेत्र तपासणी

महाराष्ट्र

मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. शालेय शिक्षण विभाग, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून, या माध्यमातून राज्यातील शासकीय शाळांमधील पाचवी ते दहावीच्या २० लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली जाणार आहे. दृष्टीदोष आढळलेल्या पात्र विद्यार्थ्यांना मोफत नंबरचे चष्मे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांच्यासह संबंधित संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

या प्रकल्पाची अंमलबजावणी शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात येणार आहे. रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट प्रकल्पाचा अंमलबजावणी भागीदार, तर वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन तांत्रिक भागीदार म्हणून काम पाहणार आहे. दृष्टीदोष असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देण्याची जबाबदारीही संस्थेकडून घेतली जाणार आहे.

३६ महिन्यांच्या कालावधीत राज्यभर नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. प्रकल्पाच्या प्रगतीचा त्रैमासिक अहवाल तयार करून तपासणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या, लाभार्थी आणि वितरित चष्म्यांचा आढावा घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डेटा संरक्षण आणि गोपनीयतेच्या तरतुदींचाही करारात समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, २०१९ पासून या उपक्रमांतर्गत राज्यातील १८ जिल्ह्यांमधील ८०० शाळांतील ६ लाख ८० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ६३ हजारांहून अधिक चष्म्यांचे वितरण करण्यात आले आहे. नव्या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीदोषाचे वेळेत निदान होऊन त्यांना आवश्यक उपचार व चष्मे मिळण्यास मदत होणार असून, त्याचा त्यांच्या शैक्षणिक प्रगतीलाही फायदा होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत