पुणे: विमाननगर येथील मसाज पार्लरमध्ये पोलिसांच्या कारवाईदरम्यान महिलेने इमारतीवरून उडी मारून मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची चौकशी आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आली आहे. महिलेच्या पतीने अमितेशकुमार यांची भेट घेऊन सखोल चौकशीची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
पुणे येथील विमाननगर परिसरातील ‘द रुट्स स्पा’ येथे देहव्यापार सुरू असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी दुपारी सुमारे तीन वाजताच्या सुमारास पोलिस पथकाने स्पा सेंटरवर छापा टाकला.
पोलिसांच्या कारवाईदरम्यान अटकेची भीती वाटल्याने महिला कर्मचारी आणि स्पा सेंटरच्या व्यवस्थापकाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. व्यवस्थापकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
सीआयडीची एन्ट्री
घटनेनंतर मंगळवारी सीआयडीच्या पथकाने विमाननगर येथील इमारतीला भेट दिली. संबंधितांचे जबाब नोंदवून, छाप्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती, याचा तपशीलवार तपास केला जाणार आहे. स्पा सेंटरचे परवाने, कर्मचारी नोंदी आणि अन्य कागदपत्रांचीही तपासणी केली जात आहे.
पुढील कारवाई
या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पा सेंटरचे व्यवस्थापन, कर्मचारी आणि अन्य संबंधितांची चौकशी सुरू असून सीआयडी तपासानंतर नेमकी जबाबदारी कोणाची, याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे.महिलेच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली असून, तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.