मुंबई महापालिका निवडणुकीत मोठे उलटफेर; वायकर कुटुंबाला धक्का

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरत असून मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत चित्र बदलत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर असली तरी अनेक ठिकाणी ठाकरे गट आणि काँग्रेसने निर्णायक धक्के दिले आहेत.

मुंबईतील वॉर्ड क्रमांक ७३ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांच्या कन्या दीप्ती वायकर-पोतनीस यांचा पराभव झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार लोना राजेंद्रसिंह रावत यांनी दीप्ती वायकर यांचा पराभव करत विजय मिळवला.

लोकसभा निवडणुकीत रविंद्र वायकर यांनी अवघ्या ४८ मतांनी विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांचा निसटता पराभव झाला होता. आता बीएमसी निवडणुकीत मुलगी दीप्ती वायकर यांचाही पराभव झाल्याने वायकर कुटुंबाला सलग तिसरा धक्का बसला आहे.जोगेश्वरी पूर्व परिसर हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात ठाकरे गटाच्या उमेदवाराने दीप्ती वायकर यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले होते, त्यात अखेर मतदारांनी ठाकरे गटालाच कौल दिला.

दरम्यान, वॉर्ड क्रमांक १८३ मध्येही शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या आशा काळे यांनी शिंदे गटाच्या वैशाली शेवाळे यांचा तब्बल १४५० मतांनी पराभव केला. वैशाली शेवाळे या माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी असून त्या माजी नगरसेविकाही आहेत. त्यामुळे या निकालामुळे राहुल शेवाळे यांनाही राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.या वॉर्डमध्ये ठाकरे गट व मनसेच्या उमेदवार पारुबाई कटके यांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे.मुंबई महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल समोर येत असून, सत्तासमीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.