डिंग्रजवाडीतून ५ लाखांचे सर्व्हे मशिन चोरीला; शिक्रापूर पोलिसांची हरियाणापर्यंत धडक!

मुख्य बातम्या शिरूर तालुका

एक आरोपी हरियाणातून, तर दुसरा विश्रांतवाडीतून जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी येथील कंपनीतून जमीन मोजणीसाठी वापरण्यात येणारे तब्बल पाच लाख रुपये किमतीचे सर्व्हे मशिन चोरी करणाऱ्या आरोपींचा शिक्रापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका आरोपीला हरियाणा राज्यातून, तर दुसऱ्या आरोपीला पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तीन लाख रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

डिंग्रजवाडी येथील इगवुड प्रा. लि. स्कॅलार स्पेसेस कंपनीमधून जमीन मोजणीसाठी वापरण्यात येणारे सर्व्हे मशिन चोरीला गेले होते. या मशिनची किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे. याप्रकरणी संग्राम शामराव मोरे (वय ४४, रा. चिखली प्राधिकरण, चिंचवड, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक तपासातून आरोपींचा माग काढला

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तपासी अधिकारी पोलीस हवालदार अजित इंगवले आणि गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला गती दिली.

या तपासादरम्यान हरी किशन जाटो (वय २४, रा. जोधपूर, राजस्थान) याला हरियाणा राज्यातून, तर अफाकजुद्दीन मुंताजिमुद्दीन काझी (वय ३६, रा. खडकी) याला पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

अन्य गुन्ह्यांचीही चौकशी सुरू

अटक करण्यात आलेल्या आरोपींनी अशाच प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत. या प्रकरणातील पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अजित इंगवले करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोलीस हवालदार अजित इंगवले, रोहिदास पारखे, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, गणेश कुदळे तसेच पोलीस अंमलदार नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत, नागेश वाघमारे, भारत भोसले, ललित चक्रनारायण आणि मयूर कुंभार यांनी सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत