पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने शनिवारी (५ सप्टेंबर) मृत्यू झाला. श्याम रोकडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे, दीड महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. संसाराची नुकतीच सुरुवात झालेली असतानाच श्याम यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
श्याम रोकडे हे पुण्यातील बाणेर परिसरात राहत होते. मागील दोन वर्षांपासून ते स्वतःची स्विफ्ट डिझायर कार चालवत भाविकांना विविध धार्मिक स्थळी ने-आण करण्याचा व्यवसाय करीत होते. याच व्यवसायातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.
शनिवारी ते पिंपरी-चिंचवड परिसरातील काही भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आले होते. दर्शनासाठी आल्यानंतर अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काही वेळातच त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यांना तातडीने तळेघर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. यासाठी डॉक्टर प्रज्वल बाणखेले यांनी प्रयत्न केले. मात्र, मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता श्याम रोकडे यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
दीड महिन्यापूर्वीच विवाह; संसाराची स्वप्ने अधुरी
श्याम रोकडे यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दीड महिन्यापूर्वीच विवाह झाल्याने त्यांच्या संसाराची नुकतीच सुरुवात झाली होती. मात्र, त्याचवेळी काळाने घाला घातल्याने त्यांच्या पत्नीवर मोठा आघात झाला आहे.
कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाच्या अचानक निधनाने नातेवाईक आणि परिचितांनाही मोठा धक्का बसला आहे. श्याम यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. भाविकांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचविण्याचे काम करणाऱ्या श्याम यांच्या आकस्मिक निधनाने बाणेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.