पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात अमित ठाकरे यांनी महाविद्यालयातील प्राध्यापकांची भेट घेतली होती. यावेळी प्राध्यापकांच्या कार्यालयातील भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याने अमित ठाकरे यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी हा फोटो हटवण्यास सांगितल्याचा आरोप असून, याप्रकरणी त्यांच्यासह २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यात आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात या वादावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, “अमित पुण्याला गेलेला असताना मोदींचा फोटो काढण्यावरून वाद झाला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या रांगेत दुसरं कोणी बसू शकत नाही.”
राज ठाकरे यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो सरकारी कार्यालयात असण्यास विरोध नसल्याचेही स्पष्ट केले. “सरकारी कार्यालयात पंतप्रधानांचा फोटो असायलाच पाहिजे. मतभेद शंभर असतील, तरी ते देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र त्यांचा फोटो दुसऱ्या भिंतीवर असावा, त्या रांगेत नाही,” असे ते म्हणाले.
सरकारी आस्थापना, शाळा आणि न्यायालयांसारख्या ठिकाणी कोणत्या व्यक्तींचे फोटो कोणासोबत असावेत, याचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी, “कोणाबरोबर कोणाचे फोटो असले पाहिजेत हे कळलं पाहिजे. त्यामुळे आताच सुधरवून घ्या,” असा इशाराही दिला.
दरम्यान, राज्यात विविध ठिकाणी धार्मिक आणि जातीय वादांमुळे निर्माण होत असलेल्या तणावावरही राज ठाकरे यांनी भाष्य केले. “सरकारला तुम्हाला जातीच्या आणि धर्माच्या वादात गुंतवून ठेवायचं आहे. तुम्ही या वादात गुंतून राहिलात तर दुसरे प्रश्न विचारणार नाहीत,” अशी टीका त्यांनी केली.
देशातील बेरोजगारी आणि इतर गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधत राज ठाकरे म्हणाले की, लोकांना धार्मिक आणि जातीय वादांमध्ये अडकवून मूळ प्रश्नांपासून त्यांचे लक्ष विचलित केले जात आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. “गणपतीदरम्यान दंगली घडवण्यात येतील आणि लोक त्याच विषयात अडकून राहतील, अशी भीती वाटते. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात असे वातावरण निर्माण केले जाऊ शकते,” असे राज ठाकरे यांनी म्हटले.