8 दिव्यांग विद्यार्थ्यांची कर्तबगारी; सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कामगिरी
पुणे: केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या UPSC 2025 नागरी सेवा परीक्षेत दीपस्तंभ फाउंडेशनच्या ‘मनोबल’ प्रकल्पातील 19 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे यामध्ये 8 दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांपैकी दृष्टिबाधित रवी राज यांनी दिव्यांग उमेदवारांमध्ये देशात अव्वल स्थान मिळवत ऑल इंडिया रँक 20 (AIR 20) पटकावली आहे. त्यामुळे मनोबल प्रकल्पाचे देशभरात कौतुक होत आहे.
दीपस्तंभ फाउंडेशनच्या ‘मनोबल’ या राष्ट्रीय प्रकल्पामध्ये पुणे, जळगाव आणि दिल्ली येथे विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल, अॅक्सेसिबल शिक्षण, तंत्रज्ञानाधारित सुविधा आणि विशेष समुपदेशन उपलब्ध करून दिले जाते. अंध, कर्णबधिर आणि अस्थिव्यंग अशा विविध प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार सुविधा दिल्या जातात. देशातील 16 राज्यांमधील सुमारे 600 विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी विनामूल्य मार्गदर्शन दिले जाते.या विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर मुळे (IFS), कुणाल कुमार (IAS), सुप्रिया देवस्थळी (ICAS), आयुषी डबास (IAS), विश्वजीत यादव (Ex-IAAS) आणि मिलिंद पाटील (विभाग प्रमुख – मनोबल) यांच्यासह सुमारे 40 अधिकाऱ्यांच्या टीमने मार्गदर्शन केले, अशी माहिती मनोबलचे अकॅडमिक हेड अमोल लंके यांनी दिली.
संस्थापकांचे मत
दीपस्तंभ मनोबलचे संस्थापक यजुर्वेन्द्र महाजन म्हणाले,“दिव्यांग विद्यार्थ्यांचे नागरी सेवा परीक्षेतील हे दैदिप्यमान यश सिद्ध करते की समस्या क्षमतेची नसून संधी आणि प्रणालीची असते. समान संधी, सुलभ शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास दिव्यांग युवक-युवती विकसित भारताचे नेतृत्व करू शकतात.”
विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया
यशस्वी विद्यार्थ्यांपैकी रेणुका केकण म्हणाल्या, “मी 2023 पासून दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाशी जोडलेली आहे. येथे मिळालेले वैयक्तिक मार्गदर्शन, अभ्यासासाठी अनुकूल वातावरण आणि सतत प्रेरणा देणारे शैक्षणिक पाठबळ यामुळे UPSC च्या प्रत्येक टप्प्यावर मला योग्य दिशा आणि आत्मविश्वास मिळाला.”
UPSC 2025 – यशस्वी विद्यार्थी
AIR 20 – रवी राज (VI)
AIR 106 – ऋतुजा गायकवाड (EWS)
AIR 173 – अक्षत बाल्डवा (VI)
AIR 195 – तुषार हिमतभाई मेंडपारा (LD)
AIR 323 – मोहिनी अशोक जगताप (EWS)
AIR 336 – अभिषेक अभय ओझरडे (EWS)
AIR 493 – मनोज पाटील (EWS)
AIR 561 – बापूसाहेब गायकवाड (EWS)
AIR 614 – सायस्ता परवीन (VI)
AIR 670 – कौशल किशोर (EWS)
AIR 677 – प्रज्वल नसरे (EWS)
AIR 687 – अल्पेश भाऊसाहेब धवळे (EWS)
AIR 754 – राजश्री देशमुख (EWS)
AIR 812 – भिकन जगन रोजेकर (EWS)
AIR 900 – भरत कुमार बनोथू (LD)
AIR 937 – परस भाटिया (VI)
AIR 941 – अनिकेत अहिरे (EWS)
AIR 943 – सूरज तिवारी (Locomotor)
AIR 948 – रेणुका केकण (HI)