मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) समर्थकांकडून करण्यात येत आहे. उबाठा गटातील खासदार संजय जाधव, संजय देशमुख, नागेश आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांनी सर्व आवश्यक संसदीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना समर्थकांच्या मते, हा केवळ पक्षांतराचा विषय नसून विकासाभिमुख राजकारणावर व्यक्त झालेला विश्वास आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघटन विस्तार, विकासकामांना प्राधान्य आणि सर्वसमावेशक राजकारण यामुळे अनेक लोकप्रतिनिधी आकर्षित होत असल्याचे पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत शिवसेना संसदीय पक्षाचे गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा आहे. संसदीय कामकाजातील अनुभव, केंद्र सरकारशी समन्वय आणि विविध लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याच्या क्षमतेमुळे विकासाच्या मुद्द्यावर सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे समर्थकांचे मत आहे.
डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संसदेत विविध प्रश्न मांडण्याबरोबरच केंद्राच्या योजनांचा लाभ महाराष्ट्रातील विविध भागांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे विकासकामांना गती देण्यासाठी सत्तेशी आणि प्रशासनाशी प्रभावी समन्वयाचे महत्त्व अनेक लोकप्रतिनिधींना पटल्याचे बोलले जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, सध्याच्या काळात मतदार विकास, रोजगार, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि उद्योगवाढ यांसारख्या मुद्द्यांवर अधिक भर देत आहेत. त्यामुळे विकासाभिमुख राजकारणाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाकडे मतदार सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत.
दरम्यान, शिवसेना समर्थकांचा दावा आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने विविध मतप्रवाहांना एकत्र आणत विकासाला केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तळागाळातील कार्यकर्ता ते राज्याचे नेतृत्व असा त्यांचा प्रवास असल्याने सामान्य नागरिकांच्या अपेक्षा आणि समस्या त्यांना जवळून समजतात, असेही कार्यकर्ते सांगतात.
या नव्या राजकीय घडामोडीमुळे शिवसेनेचे संसदीय बळ वाढण्यास मदत होणार असल्याचे पक्षातील नेत्यांचे मत आहे. तसेच आगामी काळात विकास, स्थिरता आणि प्रभावी प्रशासन या मुद्द्यांवर पक्ष अधिक आक्रमकपणे काम करेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे