मुंबई मराठीग्रंथसंग्रहालय नायगाव शाखा स्नेहसंमेलन

महाराष्ट्र

मुंबई: शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नायगांव शाखेचे ७२ वे वार्षिक स्नेहसंमेलन (दि. ३०) मार्च २०२३ रोजी उत्साहात पार पडले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप कर्णिक व प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार, लेखक सुधींद्र कुलकर्णी तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.भालचंद्र मुणगेकर कार्यक्रमास उपस्थित होते. डॉ. प्रदीप कर्णिक व प्रमुख पाहुणे सुधींद्र कुलकर्णी व शाखेचे प्रमुख कार्यवाह तसेच शाखेचे सदस्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यावर कार्यक्रमाला सुरुवात झाली. शारदाश्रम विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी ‘सरस्वती वंदन’ सादर केले. तसेच कलांजली प्रस्तुत मधुजा गोलतकर हिने सुंदर भरतनाट्यम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

बालमोहन विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थी दुर्व कुणाल दळवी याने प्रभावी असे माझी आजी यावर वक्तृत्व केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचा शाल, श्रीफळ व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.डॉ.भालचंद्र मुणगेकर सरांनी नायगाव शाखेचे,कार्यकारणी, सदस्य व सेवकांचे मनापासून कौतुक केले.

सुधींद्र कुलकर्णी यांनी छान मार्गदर्शनपर भाष्य केले त्यांना ग्रंथसंग्रहालयाबद्दल आस्था असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. ते चार वर्षांपूर्वी ग्रंथालयात आले होते. तेव्हाचे ग्रंथालय व आत्ताचे ग्रंथालय यातील फरक त्यांना जाणवला आणि त्यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे भारतातील उत्कृष्ट ग्रंथालय असू शकते हे मत मांडले आणि संस्थेच्या कार्यकारणी सदस्यांचे भरभरुन कौतुक केले. त्यांनी संस्थेच्या मराठी संशोधन मंडळ, इतिहास संशोधन मंडळ, संदर्भ विभाग व नायगाव शाखा देवघेव विभाग यांना भेट दिली व काम पाहून ते खूप भारावून गेले. भविष्यात संस्थेला लागेल ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच संस्था सुधारण्यासाठी लागणारी मदत मी करेन असेही सांगितले.

प्रदीप कर्णिक यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाबाबत माहिती दिली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे जगातील एकमेव असे ग्रंथालय आहे. जे एकूण २ संशोधन मंडळे चालवितात इतिहास संशोधन मंडळ, मराठी संशोधन मंडळ, दाते सूची मंडळ, नाट्य मंडळ असे वेगवेगळे उपक्रम संस्थेमार्फत राबविले जातात, याबद्दल त्यांनी संस्थेचे भरभरून कौतुक केले.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय नायगांव शाखेतर्फे सेनापती बापट वक्तृत्व स्पर्धा,खुली राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा व खुली सुंदर हस्ताक्षर स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक व पुस्तक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये एकूण २१ शाळा व ४५० विद्यार्थ्यांनी उत्साहने सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद केसरकर यांनी केले.नायगाव शाखेचे कार्यवाह अमेय कोंडविलकर यांनी कार्यक्रमाच्या शेवटी शाखेला देणगी दिलेल्या देणगीदारांचे आभार मानले.तसेच शाखेतील कर्मचारी व कार्यक्रमास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मदत केलेल्या सेवकांचे भेटवस्तू देऊन आभार व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.