एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

महाराष्ट्र

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० जून रोजी दिल्ली येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ची बैठक बोलावल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन आता गुरुवार, ११ जून रोजी दुपारी २ वाजता मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार Sunil Tatkare यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तटकरे म्हणाले की, एनडीएच्या बैठकीला देशभरातील घटक पक्षांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री Sunetra Ajit Pawar आणि स्वतः त्यांना या बैठकीस उपस्थित राहणे महत्त्वाचे असल्याने वर्धापन दिनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.

दोन वर्षांपूर्वी जनतेने तिसऱ्यांदा पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला देशाची सेवा करण्याची संधी दिली. या दोन वर्षांच्या कार्यकाळातील विकासकामे, देशाची प्रगती आणि जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर झालेली वाटचाल याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाने एनडीएच्या बैठकीत सातत्याने सहभाग घेतला आहे. देशाच्या विकासासाठी आणि एनडीएच्या पुढील वाटचालीसाठी या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता असल्याचे तटकरे यांनी नमूद केले.

यंदाचा २७ वा वर्धापन दिन ‘दादांना समर्पण, संघर्ष आणि संकल्प’ या संकल्पनेवर आधारित साजरा करण्यात येणार आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली संघटन विस्ताराचे काम सुरू असून बूथ स्तरापासून राज्य आणि देशपातळीपर्यंत पक्ष अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या ५० टक्के आरक्षणासंदर्भातील निर्णयानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता असल्याने पक्षाची तयारी आणि संघटनात्मक बांधणी अधिक वेगाने करण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत