shikrapur-traffic-police

शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी हे समीकरण दरवर्षीचेच! दिवाळीच्या काळात कोरेगाव भीमा चौक ते कोंढापुरीदरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने प्रवासी स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गाला मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. मात्र, यंदाच्या दिवाळीत शिक्रापूर पोलिसांनी या नेहमीच्या समस्येवर आपल्या नियोजनाच्या जोरावर मात करत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलेल्या सूक्ष्म वाहतूक नियोजनामुळे दिवाळीच्या प्रचंड गर्दीतही नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहिली असून. पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिक आणि व्यापारी वर्गातून विशेष कौतुक होत आहे.

दरवर्षी दिवाळीच्या सणाला गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते त्यातच सणसवाडी, शिक्रापूर, पाबळ चौक, कोरेगाव भीमा आदी परिसरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण निर्माण होतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन शिक्रापूर पोलिसांनी यंदा दिवाळी सुरू होण्यापूर्वीच वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले होते. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी एक अधिकारी आणि १२ अंमलदारांचे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्याने या नियोजनाला अधिक बळ मिळाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

चौकाचौकांत नियोजनबद्ध बंदोबस्त
सणसवाडी चौक, एल अँड टी फाटा, कासारी फाटा, चाकण चौक, पाबळ चौक, रिलायन्स पेट्रोल पंप आणि नगर रोडवरील ट्रॅव्हल्स थांब्यांच्या ठिकाणी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बाजारपेठांमध्ये वाहनांचे योग्य पार्किंग करून घेतल्याने रस्त्यावर वाहने उभी राहून वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याचे प्रकार टाळता आले असून.

कासारी फाटा येथून पुण्याकडे जाणारी वाहतूक तळेगाव ढमढेरे मार्गे एल अँड टी फाट्याकडे वळविण्यात आल्यामुळे चाकण चौकातील पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांचा ताण कमी झाला आणि नगरच्या दिशेने जाणारी वाहतूक अधिक वेगाने सोडणे शक्य झाले. चाकण चौकातील पेट्रोल पंप परिसरात विनाकारण वाहने उभी राहून गर्दी होऊ नये यासाठीही स्वतंत्र अंमलदार नियुक्त करण्यात आले होते.

सलग वीस तासांहून अधिक काळ वाहतूक नियंत्रण
वाहतूक व्यवस्थापनासाठी सकाळी ६ ते ११, सकाळी ११ ते सायंकाळी ५ आणि सायंकाळी ५ ते रात्री १० अशा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती तसेच कर्मचाऱ्यांना आवश्यक विश्रांती देत रात्री १० ते पहाटे २ वाजेपर्यंत पुन्हा बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून चाकण चौकात एक अधिकारी आणि पंधरा अंमलदार सलग वीस तासांहून अधिक काळ वाहतूक नियंत्रणासाठी कार्यरत होते.

कोरेगाव भीमा चौकातही बीटचे पाच पोलीस अंमलदार आणि दोन वॉर्डन नियुक्त करण्यात आले होते. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी, पोलीस अंमलदार आणि वॉर्डन यांच्या समन्वयातून वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात आले होते पहाटे पाचऐवजी रात्री एकलाच महामार्ग मोकळा झाला. यंदाच्या वाहतूक नियोजनातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दरवर्षी दिवाळीच्या गर्दीत शेवटच्या लक्झरी बसला मार्ग मोकळा होण्यासाठी पहाटे पाच वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, यंदा शिक्रापूर पोलिसांच्या प्रभावी नियोजनामुळे रात्री एक वाजताच चाकण चौक पूर्णपणे मोकळा झाला होता.

कोरेगाव भीमा ते कोंढापुरीदरम्यान कुठेही मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली नाही. त्यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांना वेळेत आणि सुखरूप प्रवास करता आल्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून पोलिसांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.

दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या काळात वाहतुकीचा ताण असतानाही नागरिकांना रस्त्यावर तासन्तास अडकून राहावे लागले नाही. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनाही वाहतूक कोंडीचा त्रास कमी झाला. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत असून पोलिसांच्या या नियोजनाबद्दल धन्यवाद देणारे संदेशही प्राप्त होत आहेत. विशेष म्हणजे केवळ वाहतूक कोंडी झाल्यानंतर ती सोडविण्यापुरते मर्यादित न राहता कोंडी होऊच नये यासाठी केलेले पूर्वनियोजन योग्य मनुष्यबळाची विभागणी पर्यायी मार्गांचा वापर आणि कर्मचाऱ्यांमधील समन्वय ही यंदाच्या बंदोबस्ताची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली टीमवर्कला यश…
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गिरी, पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्यासह पोलीस अंमलदार मिलिंद देवरे, हेमंत मडके, लखन शिरस्कर, वीरेंद्र सुंबे, नरेंद्र जाधव, धन्यदेव सोनवणे, सुशील माने, विकास सरोदे, संदीप बनकर, नवनाथ नाईकडे, श्रावण गुप्ते तसेच इतर पोलीस अंमलदार आणि वाहतूक वॉर्डन यांनी या बंदोबस्तात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

दिवाळीच्या गर्दीत नागरिकांना दिलासा देणारे हे नियोजन म्हणजे शिक्रापूर पोलिसांच्या टीमवर्कचे उत्तम उदाहरण ठरले असून वरिष्ठांचे मार्गदर्शन, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे नियोजन आणि प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने घेतलेली मेहनत यामुळे यंदा दिवाळीचा प्रवास नागरिकांसाठी अधिक सुखकर झाला आहे.

Video: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीविरोधात शिक्रापूरकर उतरले रस्त्यावर…

शिक्रापूर चाकण रस्त्यावर दहा किलोमीटर वाहतूककोंडी

शिक्रापूरमध्ये पोलीस निरीक्षकांची तत्परता; रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडीवर नियंत्रण

शिक्रापूरमध्ये वाहतूककोंडी; पाच मिनिटाच्या अंतराला एक तास…

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत