प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अधिकारी मोहन जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र

धाराशिव: उमरगा तालुक्यातील तलमोड येथे 26 जानेवारी रोजी झालेल्या शासकीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अचानक हृदयविकाराचा झटका येऊन दारूबंदी विभागाचे अधिकारी मोहन जाधव यांचा मृत्यू झाला.

घटनेवेळी अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक झेंडावंदनासाठी उभे होते. राष्ट्रगीत सुरू होण्याच्या क्षणी मोहन जाधव अचानक कोसळले. तातडीने उपस्थितांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉक्टरांच्या हाती काही होऊ शकले नाही.

मोहन जाधव मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असून उमरगा तालुक्यात अबकारी विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळावू अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक निधनाने सहकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

कार्यक्रमाच्या वेळी अधिकारी कोसळताना कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांनी त्याच्या निधनावर शोक व्यक्त करत, “राष्ट्रीय सणाच्या दिवशी कर्तव्य बजावताना आलेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.