मुंबई: स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आणि दीपावलीच्या मंगल पर्वाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित भव्य कविता स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंबईतील टिळक भवन येथे पार पडलेल्या या काव्यसोहळ्यात कवी, काव्यरसिक, काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विचार, शब्द आणि भावनांचा संगम घडवणाऱ्या या उपक्रमामुळे टिळक भवनमध्ये काव्यमय वातावरण निर्माण झाले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. त्यांनी स्वतः कविता सादर करून स्पर्धेचे उद्घाटन केले. त्यांच्या काव्यात्मक सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजन भोसले, रमेश शेट्टी, प्रदेश सरचिटणीस शाह आलम, नामदेव चव्हाण आणि डॉ. निमिष साने यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रदेश सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी विशेष पुढाकार घेतला. मुंबई काँग्रेसचे सचिव प्रशांत धुमाळ यांनी आयोजनाची जबाबदारी सांभाळली. तसेच मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष भूषण पाटील, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन, मुंबई काँग्रेसचे माजी सहखजिनदार अतुल बर्वे, राघवेंद्र शुक्ला आणि सुभाष पाखरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
रामबंधु अढांगळे प्रथम, उमेश जाधव द्वितीय
स्पर्धेतील उत्कृष्ट काव्यरचनांची निवड पत्रकार गुरुप्रसाद जाधव आणि प्राध्यापिका मनीषा रावराणे यांनी परीक्षक म्हणून केली. स्पर्धेत रामबंधु खंडू अढांगळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर उमेश जाधव यांनी द्वितीय आणि कौस्तुभ शैलेश गोसावी यांनी तृतीय क्रमांक मिळविला. प्रणय चव्हाण आणि वैष्णवी सावळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कवितेच्या माध्यमातून विचारांची अभिव्यक्ती, सामाजिक जाणिवा आणि साहित्यिक प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.