रुबल नागी! झोपडपट्ट्यांतील मुलांचे भविष्य बदलणारी ‘ग्लोबल टीचर’

महाराष्ट्र

दुबई: जिद्द, चिकाटी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ असली तर नशिबाचे दरवाजे आपोआप उघडतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे रुबल नागी. दुबईत (Dubai) आयोजित ‘जागतिक सरकार शिखर परिषदे’च्या (World Government Summit) व्यासपीठावर भारतातील झोपडपट्ट्यांतील शिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी रुबल नागी यांचा ‘ग्लोबल टीचर प्राइज २०२६’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

या पुरस्काराची रक्कम तब्बल १० लाख अमेरिकन डॉलर्स (अंदाजे ८.३ कोटी रुपये) इतकी आहे. पुरस्कार स्वीकारताना रुबल नागी भावूक झाल्या आणि म्हणाल्या, “हे माझ्या २४ वर्षांच्या तपस्येचे फळ आहे. हा पुरस्कार केवळ माझा नाही, तर त्या लाखो मुलांचा आहे ज्यांना प्रतिकूल परिस्थितीतही शिकण्याची ओढ आहे.”

‘मिसाल इंडिया’ आणि झोपडपट्ट्यांचे रूपांतर

रुबल नागी केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर शिक्षणाला कलेची जोड देतात. ‘मिसाल इंडिया’ आणि ‘मिसाल मुंबई’ या उपक्रमांद्वारे त्यांनी १० लाखांहून अधिक मुलांचे आयुष्य बदलले आहे. यासोबतच झोपडपट्ट्यांतील १.५ लाखांहून अधिक घरांना रंग लावून परिसर उजळविला, स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी आणि व्यावसायिक प्रशिक्षण यांसारख्या मूलभूत गरजांवर काम केले आहे.रुबल नागी यांचा ठाम विश्वास आहे, “शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे.”

ग्लोबल टीचर प्राइज म्हणजे काय?

वॉर्की फाउंडेशन (Varkey Foundation) आणि युनेस्को (UNESCO) यांच्या सहकार्याने दिला जाणारा हा पुरस्कार जगातील शिक्षकांसाठीचा सर्वोच्च सन्मान मानला जातो. याला ‘शिक्षकांसाठीचे नोबेल’ असेही संबोधले जाते. १३९ देशांमधून आलेल्या ५,००० अर्जांमधून रुबल नागी यांची निवड होणे भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

भारतासाठी प्रेरणादायी उदाहरण

रुबल नागी यांचा प्रवास प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला लावणारा आहे. “भारतातील प्रत्येक मूल शाळेत असावे, हेच माझे अंतिम स्वप्न आहे,” असे सांगताना त्यांचा आत्मविश्वास आणि समर्पण जगभर प्रेरणादायी ठरते. ८ कोटी रुपयांची ही रक्कम आता भारतातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरली जाणार आहे.