सलग दुसऱ्यांदा हत्याकांड! भांडुपमध्ये तरुणाची निर्घृण हत्या, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

क्राईम महाराष्ट्र

मुंबई: गेल्या 24 तासांत मुंबईत घडलेल्या सलग दोन हत्याकांडांमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. मालाडमध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेल्या हत्येनंतर आता भांडुप परिसरात एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

भांडुप परिसरात राहणाऱ्या शंकर प्रसाद ऊर्फ कली या तरुणावर दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी शंकरवर तब्बल 22 ते 30 वेळा वार केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की शंकर रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने शंकरला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, शरीरावर झालेल्या गंभीर जखमा आणि मोठ्या प्रमाणातील रक्तस्रावामुळे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर भांडुप परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हत्येची माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या वादातून किंवा वैयक्तिक शत्रुत्वातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शनिवारी (24 जानेवारी) मालाड रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनमध्ये झालेल्या वादातून ओंकार शिंदे या तरुणाने अलोक सिंग नावाच्या प्राध्यापकाची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी अवघ्या काही तासांत भांडुपमध्ये घडलेल्या हत्याकांडामुळे मुंबईकरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.शहरात वाढत चाललेल्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.