सस्पेंड केलं तरी चालेल! बाबासाहेबांच्या नावावरून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महिला पोलिसांचा पालकमंत्र्यांना थेट जाब

महाराष्ट्र

नाशिक: संपूर्ण देशात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना नाशिकमधून एक वेगळीच आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान मोठा गोंधळ उडाला. भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याने एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने थेट जाब विचारला.

वन विभागात कार्यरत असलेल्या माधवी जाधव यांनी पालकमंत्र्यांच्या भाषणावर आक्षेप घेत जोरदार प्रतिक्रिया दिली. “ज्यांनी संविधान दिलं, लोकशाही घडवली त्या बाबासाहेबांचं नाव भाषणात का नाही?” असा थेट सवाल त्यांनी केला.

वाद वाढल्यानंतर माध्यमांशी बोलताना माधवी जाधव म्हणाल्या,”गिरीश महाजनांनी फार मोठी चूक केली आहे. ज्यामुळे संविधान अस्तित्वात आहे, त्या बाबासाहेबांना संपवण्याचं काम सुरू आहे. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. मी वाळूच्या गाड्या उतरेन, माती काम करेन, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही.”

त्यांनी पुढे सांगितलं की,”मी बाबासाहेबांचं नाव भाषणात येईल याची वाट पाहत होते. पण लोकशाही आणि संविधानाशी संबंध नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेतली गेली. मग संविधानाचा खरा मानकरी असलेल्या बाबासाहेबांचं नाव का नाही?”

या घटनेनंतर पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतलं. त्यांच्या भूमिकेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेवर राजकीय व सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.