मुंबई: मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टाने मंगळवारी मनाई केली. तसेच नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगी द्यावी, असे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले.
मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांची डोकेदुखी वाढली असून ते पुढे काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्सव काळात मुंबईत उपोषणाला येणं टाळावं, अशी विनंती करण्यासाठी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र साबळे हे अंतरवाली सराटी इथं दाखल झाले होते. राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत याबाबत चर्चाही केली. मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका या भेटीनंतर जरांगेंनी मांडली. आम्ही मुंबईला निघण्याआधी सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, तरंच आम्ही माघार घेऊ, असं जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. परंतु आता हायकोर्टानेच मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केल्याने मनोज जरांगेंची कोंडी होणार आहे.