सोयाबीन पावणेसहा, तूर आठ हजारांवर; बाजारपेठेत भाववाढ, आवक मात्र मंद

महाराष्ट्र

मुंबई: बाजारपेठेत सोयाबीनच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असली तरी आवक मात्र लक्षणीयरीत्या घटली आहे. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सुमारे ५ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत असून, मागील १५ ते २० दिवसांपासून दररोज नियमितपणे दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढल्याने सोयाबीन डीओसी (ढेपी)लाही मोठी मागणी निर्माण झाली आहे. ढेपीच्या दरात वाढ झाल्यामुळे सोयाबीनला अधिक मागणी दिसून येत आहे.

मात्र काढणीच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री ४ हजार २०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान केल्याने सध्या बाजारात आवक कमी आहे. याचाच फायदा घेत सुरुवातीला कमी किमतीत सोयाबीन खरेदी करून साठवणूक केलेल्या व्यापाऱ्यांनी आता भाववाढ होताच साठवलेला माल विक्रीस काढण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, बाजारात नवीन हंगामातील तुरीची आवक सुरू झाली असून तुरीच्या दरातही तेजी आहे. सध्या नवीन तुरीला प्रतिक्विंटल ८ हजार १०० रुपयांचा भाव मिळत आहे. आठवडाभरापूर्वी ८ हजार ९०० रुपयांपर्यंत गेलेले तुरीचे दर आता स्थिरावले असले तरी यंदा तुरीला चांगला भाव राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनऐवजी तूर विक्रीला प्राधान्य दिले आहे.

सोयाबीनच्या दरात तेजी असूनही आवक कमी असल्याने, साठवणूक केलेल्या शेतकरी व व्यापाऱ्यांना आणखी भाववाढीची अपेक्षा आहे, अशी माहिती व्यापारी वर्गाकडून देण्यात आली आहे.

ओमकार नावडे, भुसार व्यापारी, कळमनुरी