काका-पुतण्याचं जिव्हाळ्याचं नातं; रोहित पवारांच्या ‘हेअर स्टाईल’वरून अजित पवारांचा मिश्किल टोला चर्चेत

महाराष्ट्र

पुणे: रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील नातं केवळ राजकीय नसून कुटुंबीय जिव्हाळ्यावर आधारित असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं. राजकारणातील वाटा वेगळ्या असल्या, तरी काका-पुतण्याचं नातं मात्र कायम जपलं गेलं आहे.

रोहित पवार हे भविष्यातील प्रभावी नेतृत्व करण्याची क्षमता असलेले नेते आहेत, हे अजित पवारांनी सुरुवातीपासून ओळखलं होतं. त्यामुळेच कधी चुकलं, तर काका म्हणून अधिकारवाणीने समज देणं, रागावणं किंवा टोला लगावणं, हे अजित पवार मोकळेपणाने करत असत. रोहित पवार यांनीही काकांचं बोलणं नेहमी सकारात्मकपणे घेतलं.

विधानसभेतला क्षण ठरला चर्चेचा विषय

अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी रोहित पवार विधानसभेत दाखल झाले असताना, एका वृत्तवाहिनीशी ते संवाद साधत होते. त्याच वेळी मागून येत असलेल्या अजित पवारांनी रोहित पवारांकडे पाहत,

“झीपऱ्या वाढल्या तूझ्या”

अशी मिश्किल टिप्पणी केली.

यावर रोहित पवारही हसत मागे वळले. काका-पुतण्यामधील हा हलका-फुलका संवाद कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

‘हेअर स्टाईल’वरून काकांची समज

राजकारणातील पेहराव आणि वावराबाबत काही अलिखित संकेत असतात. युवा नेते कधी त्यात बदल करतात. रोहित पवार यांनीही अलीकडे नवी ‘हेअर स्टाईल’ स्वीकारली होती. मात्र अजित पवार यांच्या बारकाईने पाहणाऱ्या नजरेतून हा बदल सुटला नाही.

रोहित पवार समोर येताच,

“वाढलेल्या झिपऱ्या कापा,”

असं थेट आणि स्पष्ट सांगत अजित पवारांनी आपल्या खास शैलीत समज दिली.

अजित पवारांची शैली आजही चर्चेत

सरळ, रोखठोक आणि मिश्किल भाषाशैली ही अजित पवारांची ओळख आहे. हसवत-हसवत टोला लगावणं, पण मुद्दा ठामपणे मांडणं, ही त्यांची खासियत आहे. काका-पुतण्यामधील अशा छोट्या पण अर्थपूर्ण क्षणांमधून पवार कुटुंबातील नातेसंबंधांची जिवंतता पुन्हा एकदा समोर आली आहे.