पुण्यात सोमवारी काही रस्ते बंद, काही शाळा-कॉलेजेसना सुट्टी

महाराष्ट्र

2026 पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

पुणे: शालेय विद्यार्थी, पालक तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 2026 पुणे ग्रँड चॅलेंज टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे सोमवारी (दि. 19 जानेवारी) पुणे शहरातील काही प्रमुख रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरातील काही भागांमधील शाळा, कॉलेजेस आणि शैक्षणिक संस्थांना एका दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

रस्ते बंद राहण्याचे कारण

पुणे शहरात उद्या 2026 पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेतील प्रोलॉग रेसचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काही प्रमुख रस्ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणते रस्ते राहणार बंद

प्रोलॉग रेससाठी

फर्गसन कॉलेज रोड

गणेशखिंड रोड

जंगली महाराज रोड

तसेच या रस्त्यांना जोडणारे सर्व उपमार्ग

हे सर्व रस्ते सोमवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.

विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय 

रस्ते बंद राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये पोहोचताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी संबंधित भागांतील अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच व्यावसायिक शिक्षण संस्था एक दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या भागांतील शाळांना सुट्टी

छत्रपती शिवाजीनगर – घोले रोड

विश्रामबागवाडा – कसबा

ढोले पाटील रोड

भवानी पेठ

औंध – बाणेर

कोथरुड – बावधन

सिंहगड रोड

वारजे – कर्वेनगर

दरम्यान, शहरातील सर्वच शाळा व कॉलेजेस बंद राहणार नाहीत. केवळ ज्या भागांमध्ये स्पर्धेमुळे वाहतूक कोंडीची शक्यता आहे, त्या भागांतील शैक्षणिक संस्थांनाच ही सुट्टी लागू असणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.