GST अधिकारी सचिन जाधवर मृत्यू प्रकरणाला नवे वळण; सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव

क्राईम महाराष्ट्र

बीड: बीड येथील वस्तू व सेवा कर (GST) कार्यालयातील अधिकारी सचिन नारायण जाधवर यांच्या मृत्यू प्रकरणाने आता खळबळजनक वळण घेतले आहे. “माझे पती कधीच आत्महत्या करू शकत नाहीत. गेल्या महिनाभरापासून त्यांना सातत्याने मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले,” असा गंभीर आरोप त्यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी केला आहे.शक्रवारी त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत या प्रकरणातील धक्कादायक बाबी समोर आणल्या.

षडयंत्राचा संशय, टोकाच्या छळाचे आरोप

१७ जानेवारी रोजी कपिलधारवाडी परिसरात सचिन जाधवर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील सुसाईड नोटमध्ये सहाय्यक आयुक्त दिलीप फाटे यांच्या नावाचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे.

मयुरी जाधवर यांच्या म्हणण्यानुसार, “छळ फक्त कार्यालयापुरता मर्यादित नव्हता. आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. कार्यालयाबाहेर त्यांच्या वाहनाला धडक देण्यात आली, शिवीगाळ करण्यात आली. हे सर्व त्यांना मानसिकदृष्ट्या खच्ची करण्यासाठीच केले गेले.”

पोलीस कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

घटनेला आठवडा उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याने कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “मूळ सुसाईड नोट आम्हाला का दाखवली जात नाही? पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव आहे?” असा थेट सवाल मयुरी जाधवर यांनी उपस्थित केला. सचिन जाधवर यांच्या भावानेही आरोपींवर तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.

पोलीस ठाण्यात ठिय्या, प्रशासनावर दबाव

पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर जाधवर कुटुंबीय व नातेवाईकांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. “जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत उठणार नाही,” असा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ठिय्या मागे घेण्यात आला. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या मृत्यूमागील हे गूढ नेमके कधी उलगडणार, आरोपींवर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.