जुन्नर: जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष पांडुरंग पवार यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तोंडावर असताना ही कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे पक्ष सध्या शोकाकुल अवस्थेत असताना, पांडुरंग पवार यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या या वर्तनामुळे पक्षशिस्तीला तडा गेला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पांडुरंग पवार यांची सून कविता संदीपान पवार या बोरी बुद्रुक–खोडद गटातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कविता पवार यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे पांडुरंग पवार यांनी आपल्या तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठवून नाराजी व्यक्त केली होती. पक्षाने त्यांचा राजीनामा मंजूर करतानाच त्यांच्या प्राथमिक सदस्यत्वावरही कारवाई केली आहे.या घडामोडींमुळे जुन्नर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडे विशेष लक्ष दिले जात आहे.