बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजना; २३ जानेवारीपासून राज्यभर अंमलबजावणी

महाराष्ट्र

मुंबई: सर्वसामान्य माणसाच्या श्रद्धेला सुरक्षितता आणि परवडणाऱ्या खर्चाची जोड देणारी एक महत्त्वाकांक्षी लोकाभिमुख योजना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने साकारली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार आणि स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे — एसटी संगे तीर्थाटन’ या विशेष योजनेची घोषणा करण्यात आली आहे.

ही योजना म्हणजे श्रद्धा, सुविधा आणि सामाजिक न्याय यांचा सुरेख संगम असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. ‘स्वस्त आणि सुरक्षित’ या ब्रीदवाक्यावर आधारित ही योजना असून, सर्वसामान्य प्रवाशांना परवडणाऱ्या दरात धार्मिक पर्यटनाचा अनुभव देणे हा तिचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेत राज्य शासनाने एसटी प्रवासासाठी दिलेल्या सर्व सामाजिक सवलती जशाच्या तशा लागू राहणार आहेत. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मूळ तिकिटावर ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पूर्णतः मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. प्रत्येक आगार कार्यक्षेत्रातून ४० प्रवाशांचा गट तयार करून, त्यांच्या सामाजिक सवलतीनुसार सहलींचे आयोजन करण्यात येणार आहे.

या सहलींसाठी एसटीच्या नव्या, सुरक्षित व आरामदायी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे. २३ जानेवारी २०२६ पासून ही योजना राज्यातील २५१ आगारांमध्ये एकाच वेळी राबविण्यात येणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार प्रत्येक आगारातून किमान पाच बसेस या योजनेसाठी देण्यात येणार असून, त्यामुळे दररोज सुमारे १,००० ते १,२५० धार्मिक व पर्यटन विशेष बसगाड्या राज्यभर धावणार आहेत.

योजनेअंतर्गत अष्टविनायक दर्शन, ११ मारुती दर्शन, पंढरपूर–अक्कलकोट, तुळजापूर, कोल्हापूर–पन्हाळा–जोतिबा, गणपतीपुळे, शेगाव, शिर्डी आदी प्रमुख श्रद्धास्थळांच्या सहली आयोजित केल्या जाणार आहेत. यामुळे भाविकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वैभवाचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
‘स्वस्त आणि सुरक्षित पर्यटन’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारी ही योजना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वसामान्यांवरील प्रेमाची आणि विचारांचीच पुढची पायरी असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ही योजना राज्यातील लाखो भाविकांसाठी श्रद्धेचा, सुरक्षिततेचा आणि समाधानाचा प्रवास ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.