मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, या अभियानातून तब्बल ७ हजार पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी प्रदेश काँग्रेसतर्फे विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २६ ते २९ मेदरम्यान मुंबईतील टिळक भवन येथे विभागनिहाय पार पडणार आहे.
प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या शिबिरात विविध विषयांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. संघटन बांधणी, पक्षाची विचारधारा, जनसंपर्क, सोशल मीडिया व निवडणूक व्यवस्थापन आदी विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षक नियुक्त केले होते. त्यांच्यासोबत प्रदेश काँग्रेसनेही दोन निरीक्षकांची नियुक्ती केली होती. या निरीक्षकांनी जिल्हा व तालुका स्तरावर जाऊन इच्छुकांकडून अर्ज मागवले, मुलाखती घेतल्या आणि त्यानंतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.या प्रक्रियेत आघाडी, संघटना, विभाग आणि सेल स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) Adv. Ganesh Patil यांनी दिली.