दुष्काळात बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही; आज मदतीचा हात, उद्या शेताला पाणी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र

नांदेडच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही; १०० बेडचे रुग्णालय २०० बेडचे करण्याचे निर्देश, शेतकऱ्यांना पाच हजारांची तातडीची मदत

नांदेड: राज्यात दुष्काळाचे संकट असताना बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देण्यासोबतच भविष्यात शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सिंचन आणि जलसंपदा प्रकल्पांना गती देण्यात येईल. तसेच नांदेडमधील विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार अशोक चव्हाण, आमदार हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर, आनंद बोंढारकर, बाबुराव कदम कोहळीकर, अमर राजुरकर, भीमराव केराम, जितेश अंतापूरकर, नांदेडच्या महापौर कविता मुळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत अंतिम नाही!

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना विविध सवलती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांच्या घरात अंधार राहू नये, यासाठी पाच हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. मात्र, ही मदत अंतिम नसून शेतकऱ्यांना पुढील मदतही मिळत राहील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

केंद्र आणि राज्य सरकार बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे असून, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. कर्जवसुलीच्या नावाखाली मायक्रो फायनान्स कंपन्या किंवा सावकारांनी शेतकऱ्यांना त्रास देऊ नये. चुकीच्या वसुलीमुळे शेतकऱ्यांच्या जीवावर बेतल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

१०० बेडचे रुग्णालय होणार २०० बेडचे

नांदेडच्या आरोग्य सुविधांचा आढावा घेताना नव्याने उभारण्यात आलेल्या रुग्णालयात स्कॅनिंग आणि डायलिसिस मशीन तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. तसेच १०० बेडचे रुग्णालय २०० बेडपर्यंत विस्तारित करण्यास सांगितले. एडीबीच्या माध्यमातून ५०० बेडचे आणखी एक नवीन रुग्णालय उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

आरोग्य संवाद यात्रेच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचे काम सुरू आहे. मात्र, आरोग्यसेवेत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली.

रस्ते, सिंचन, भूमिगत गटारांसह विविध प्रकल्पांना गती

नांदेड उत्तर मतदारसंघातील कृषी महाविद्यालय, अहिल्यादेवी स्मारक, हनुमानगड संस्थानचा जीर्णोद्धार, भूमिगत गटार योजना, रस्ते, जोडरस्ते आणि रिंगरोड यांसारख्या विकासकामांचा त्यांनी उल्लेख केला. इनामी जमिनी वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्याच्या प्रश्नावरही सरकार सकारात्मकतेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार बालाजी कल्याणकर यांनी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक करत २०२२ मधील सत्तांतराच्या काळातही ते खांद्याला खांदा लावून सोबत होते, असे शिंदे म्हणाले. महायुतीने एकजुटीने पुढे जात विकासकामांना गती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

दुष्काळामुळे मुलांचे शिक्षण, मुलींचे विवाह थांबणार नाहीत

दुष्काळाचा परिणाम केवळ शेतावर होत नाही, तर संपूर्ण कुटुंबावर होतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण आणि मुलींच्या विवाहाची जबाबदारीही सरकारच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. हदगाव येथे १०० मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार असून खासदार आणि आमदारांनीही गरजू कुटुंबांच्या विवाहांची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

‘आपत्ती तिथे शिवसेना, संकट तिथे शिवसेना’ या भावनेतून गरजूंना सायकली, शिलाई मशीन आणि दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट करत या योजनेमुळे महिलांच्या हातात आर्थिक ताकद निर्माण झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मदत आणि केंद्र व राज्य सरकारच्या किसान सन्मान निधीतून वर्षाला एकूण १२ हजार रुपयांची मदत अशा योजनांचाही त्यांनी उल्लेख केला.

‘आज मदतीचा हात, उद्या शेताला पाणी’

दुष्काळाचे संकट असले तरी विकासकामे थांबणार नाहीत, असे स्पष्ट करत नांदेड उत्तरसाठी एसटी बसस्थानकाची मागणी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांना दिले. ११ जलसंपदा प्रकल्पांना मंजुरी, मुख्यमंत्री असताना १४० सिंचन प्रकल्पांना दिलेली मंजुरी आणि सुमारे १४ हजार कोटी रुपयांच्या पाणी योजनांचा उल्लेख करत शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधकांनी संकटाच्या काळात राजकारण न करता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करत शिंदे म्हणाले, “मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुमच्या हक्काचा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत आणि भविष्यात सिंचनाच्या माध्यमातून कायमस्वरूपी दिलासा, असा दुहेरी दृष्टिकोन सरकारचा असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत