‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवून मोदींना हटवण्याचे स्वप्न पाहू नका! विरोधकांना एकनाथ शिंदेंचा ठाण्यातून घणाघात

महाराष्ट्र

‘लोकतंत्र बचाव’च्या नावाखाली काँग्रेसकडून लोकशाहीबाबत संभ्रम; व्होट चोरीच्या आरोपांवर पुरावे देण्याचे शिंदेंचे आव्हान

ठाणे : ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’च्या नावाखाली काँग्रेस, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जाणीवपूर्वक ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवले जात असल्याचा जोरदार आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. १९७५ मधील आणीबाणीची आठवण करून देत, त्यावेळी विरोधी नेते तुरुंगात होते आणि माध्यमांवर निर्बंध होते. मात्र आज विरोधकांना जंतरमंतरपासून पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य असतानाही लोकशाही धोक्यात असल्याचा कांगावा केला जात आहे, असा घणाघात त्यांनी केला.

ठाणे शहर भाजपच्या वतीने आयोजित ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ पदयात्रा आणि आंदोलनात ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि घटनात्मक संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून काँग्रेस देशात संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. न्यायव्यवस्थेवर दबाव आणणे आणि न्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी करणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा अपमान असल्याचेही शिंदे म्हणाले.

‘व्होट चोरी’च्या आरोपांवर शिंदेंचा काँग्रेसला सवाल!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘व्होट चोरी’च्या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी थेट पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले. तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि हिमाचल प्रदेशात काँग्रेसची सरकारे सत्तेवर आली, तीदेखील व्होट चोरी करूनच आली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ईव्हीएमवर निवडून आलेल्या खासदारांनी राजीनामे देऊन व्होट चोरीचे आरोप सिद्ध करावेत, असे आव्हानही त्यांनी दिले.

२०१९ मध्ये जनतेने शिवसेना-भाजप युतीला कौल दिला होता. मात्र काँग्रेससोबत सत्ता स्थापन करून जनतेच्या जनादेशाला हरताळ फासण्यात आला. खरी व्होट चोरी तेव्हाच झाली, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे गटाला लगावला. कोविड काळात मुंबई महापालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत, आज व्होट चोरीची भाषा करणाऱ्यांनी आधी स्वतःचा कारभार तपासावा, अशी टीकाही शिंदे यांनी केली.

‘नया भारत’ची ताकद जगाने मान्य केली!

२०१४ पूर्वीचा भारत आणि आजचा ‘नया भारत’ यांची तुलना करताना शिंदे यांनी पाकिस्तानविरोधातील कारवाया, ऑपरेशन सिंदूर, दहशतवादाविरोधातील कठोर भूमिका, नक्षलवादावरील कारवाई, राम मंदिराची उभारणी आणि कलम ३७० हटवण्याचा उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली असती, असेही ते म्हणाले.

मोदी सरकारने कोट्यवधी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढले असून, ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य, जनधन योजना, लखपती दीदी, पीएम-किसान, बेटी बचाओ, स्टार्टअप, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या विविध योजना राबवल्याचा दावा त्यांनी केला. जागतिक बँकेच्या अहवालाचा संदर्भ देत देशातील गरिबीचे प्रमाण २७.१ टक्क्यांवरून २.६ टक्क्यांवर आल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांना ३६ देशांनी सर्वोच्च नागरी सन्मान दिल्याचा उल्लेख करत त्यांनी मोदींच्या नेतृत्वाचे समर्थन केले.

तरुणांच्या भविष्याशी खेळू नका!

कॅप्टन स्मिथ यांनी पंतप्रधान मोदी यांना प्रेरणास्थान मानल्याचा संदर्भ देत शिंदे यांनी विरोधकांना लक्ष्य केले. तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्यापेक्षा त्यांना रोजगार, कौशल्य आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले.

“मोदी हटावचा नॅरेटिव्ह आता चालणार नाही. फेक नॅरेटिव्ह आणि गोबेल्स नीतीला जशास तसे उत्तर द्या. महाराष्ट्रात महायुतीचा आणि देशात एनडीएचा भगवा परचम फडकत राहील,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. २०२९ नंतरही नव्हे, तर पुढील अनेक वर्षे विकासाचा वेग कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजप-शिवसेनेच्या दिग्गजांची उपस्थिती

या पदयात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, डॉ. हेमंत सावरा, माजी खासदार कपिल पाटील, संजीव नाईक, आनंद परांजपे, आमदार योगेश सागर, मंदा म्हात्रे, स्नेहा दुबे-पंडित, रवींद्र फाटक, राजन नाईक, निरंजन डावखरे, विक्रांत पाटील, कुमार अयलानी, शिवाजी पाटील, नरेंद्र मेहता, प्रशांत ठाकूर, सुलभा गायकवाड, राजेश मोरे, शांताराम मोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत