नाशिकच्या ‘हनीट्रॅप’ प्रकरणातला ‘तो’ हॉटेलचालक कोण?

महाराष्ट्र

नाशिक: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी नाशिकच्या हनीट्रॅप प्रकरणावर सभागृहाला माहिती दिली. शिवाय कुठल्याही आजी-माजी मंत्र्याची तशी तक्रार नसल्याचं ते म्हणाले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार नाना पटोले यांनी गुरुवारी सभागृहात पेन डाईव्ह बॉम्ब फोडला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील नाशिकच्या हॉटेल चालकाचे कारनामे उघड केले होते. अनेक मोठे अधिकारी आणि बुहतांश नेत्यांनी नाशिकच्या त्या हॉटेलचा पाहुणचार घेतल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला होता.

जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, नाशिकचा तो हॉटेलचालक बहुतांश राजकीय नेत्यांच्या जवळचा आहे. तो त्या नेत्यांची सगळी सोय करतो. त्याने एक रुम केली असून हॉटेलमध्ये ८ कोटी रुपयांचे कॅमेरे बसवलेले आहेत. या कॅमेऱ्याचा वापर तो पुढाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अडकवण्यासाठी करतो.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन करताना म्हटलं की, सध्यातरी सरकारकडे कुठल्याही आजी-माजी मंत्र्यांच्या हनीट्रॅपची तक्रार नाही. नाना पटोलेंनी जो पेन ड्राईव्ह दाखवला तो त्यांनी आमच्याकडे द्यावा. त्याची चौकशी करु.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, नाशिकसंदर्भात एक तक्रार आलेली होती. एका महिलेने तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांनी ही तक्रार परत घेतली. एका उपजिल्हाधिकाऱ्यासंदर्भात ही तक्रार होती. आपण सातत्याने हॉटेल आणि हॉटेल मालकाचा उल्लेख करतायत. ती व्यक्ती काँग्रेसची आहे. त्या व्यक्तीने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. अशा प्रकारे सभागृहाचा वेळ घालवणे, सभागृह बंद पाडणं चूक आहे. थेट पुरावे आणायचे आणि सत्ताधारी पक्षाची बोलती बंद करायची, असा सल्लाच फडणवीसांनी विरोधकांना दिला.