त्यांना मी कधीच मनापासून माफ करणार नाही अस नरेंद्र मोदी का म्हणाले होते

महाराष्ट्र

मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोटात प्रकरणात माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सर्व ७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एनआयएच्या विशेष कोर्टाने १७ वर्षांनंतर हा महत्वाचा निकाल दिला. या खटल्यातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा या २०१९ मध्ये भोपाळमधून खासदार म्हणून निवडून आल्या, मात्र त्यांना काही दिवसांतच पंतप्रधान मोदींच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. “मी त्यांना कधीच मनापासून माफ करणार नाही,” असं मोदींनी जाहीरपणे सांगितले होते. परिणामी साध्वी प्रज्ञासिंह यांना २०२४ मध्ये खासदारकीचे तिकिट मिळाले नव्हते, त्यामुळे त्यांच्या राजकारणीतील करियरला ब्रेक लागल्याची चर्चा सुरु झाली होती.

साध्वींचा विजय

भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपने २०१९ मध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली होती, तर काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह निवडणूक रिंगणात होते. परंतु साध्वी यांनी ३ लाख ६४ हजार मतांनी विजय मिळवला. त्यांनी निवडणुकीत त्यांचा एकूण खर्च फक्त ४५ लाख रुपये दाखवला होता. हा खर्च लोकवर्गीतून आणि काही संस्थांनी केल्याच सांगण्यात आले होते.

साध्वींचे वादग्रस्त विधान

मे २०१९ मध्ये, साध्वी प्रज्ञा देवास लोकसभेचे उमेदवार महेंद्र सिंह सोलंकी यांच्या प्रचारासाठी आगर येथे गेल्या होत्या. निवडणूक प्रचारादरम्यान साध्वी प्रज्ञा यांनी महात्मा गांधींचा खून करणारा नथुराम गोडसे याला खरा देशभक्त म्हटले. व्हिडिओ समोर आल्यानंतर निवडणुकीच्या हंगामात भूकंप झाला. भाजपने लगेचच या विधानापासून स्वतःला दूर केले. पक्षातील सर्व नेत्यांनी साध्वी प्रज्ञा यांच्या विधानाला वैयक्तिक म्हणण्यास सुरुवात केली. देशात निवडणुकांचे काही टप्पे शिल्लक होते. पक्षाच्या दबावाखाली साध्वी प्रज्ञा यांनी माफी मागितली.

पंतप्रधान मोदींचा रोष

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही शेवटची रॅली होती. रॅलीच्या शेवटच्या दिवशी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की गांधीजी किंवा गोडसे यांच्याबद्दल बोललेल्या गोष्टी अत्यंत वाईट आहेत. त्यांना सर्व प्रकारच्या द्वेषाला पात्र आहे. सुसंस्कृत समाजात अशी भाषा चालत नाही. ही विचारसरणी काम करू शकत नाही. त्यांनी माफी मागितली आहे पण मी त्यांना मनापासून कधीच माफ करू शकणार नाही.

राजकारणातील करियरला ब्रेक

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या निवडून आल्या पण या विधानामुळे त्यांच्या राजकीय करियरला ब्रेक लागल्याचे सांगितले जाते. भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांचे भोपाळ लोकसभा मतदारसंघातून तिकीट कापण्यात आले आहे. त्यांचे तिकीट कापून माजी महापौर आलोक शर्मा यांना देण्यात आले. यावर साध्वी माध्यमांशी बोलताना त्यांचे दुःख स्पष्ट दिसून आले. त्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची काही विधाने आवडली नाहीत, परंतु त्या त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.