आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

महाराष्ट्र

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले असून, नाशिकहून मुंबईपर्यंत लाँग मार्च करत आलेल्या विद्यार्थ्यांवर मुंबईत पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने दादर येथील टिळक भवन तसेच आझाद मैदानाजवळील मुंबई काँग्रेस कार्यालयात या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, रात्री अचानक पोलिसांनी कारवाई करत विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप NSUI चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांनी केला. ही कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सागर साळुंके म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याची पूर्वकल्पना दिली होती. नाशिकहून मुंबईपर्यंत विद्यार्थी आले असताना त्यांनी आंदोलनासाठी परवानगी मागितली; मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था टिळक भवन तसेच मुंबई काँग्रेस कार्यालयात करण्यात आली.

मात्र, रात्री अचानक पोलिसांनी कारवाई सुरू केली. नवी मुंबईत काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले. काही विद्यार्थी-विद्यार्थिनींना मारहाण करण्यात आल्याचा, तर एका विद्यार्थ्याला बेशुद्ध पडल्याचा आरोप साळुंके यांनी केला. काही विद्यार्थ्यांना भिवंडी येथे सोडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई काँग्रेस कार्यालयात झोपलेल्या विद्यार्थ्यांनाही पोलिसांनी उठवून ताब्यात घेतले. त्यांना यलो गेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दादरमधूनही काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला. काँग्रेस कार्यालयातील कर्मचाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे साळुंके यांनी सांगितले. संबंधितांना सुरुवातीला दादर पोलीस ठाणे, त्यानंतर चुनाभट्टी आणि शेवटी कोपरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. काँग्रेस नेत्यांनी पोलिसांशी सातत्याने संपर्क साधल्यानंतर काही विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिल्याचा आरोप

मुंबई NSUIचे अध्यक्ष प्रद्युम यादव यांनीही पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. “पोलिसांनी विद्यार्थी आणि मलाही जबरदस्तीने उचलून नेले. आधी दादर पोलीस ठाण्यात नेले, त्यानंतर चुनाभट्टी पोलीस ठाण्याकडे नेण्यात आले. वेगवेगळ्या पोलीस वाहनांतून विद्यार्थ्यांना फिरवण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देण्यात आली,” असा आरोप यादव यांनी केला.

“बाथरूममधून बाहेर येताच ताब्यात घेतले”

आंदोलक विद्यार्थिनींनीही पोलिसांच्या कारवाईबाबत गंभीर आरोप केले. काही सहकाऱ्यांना पोलिसांनी रस्त्यातूनच ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. टिळक भवनमध्ये अंघोळ करून बाहेर येत असतानाच बाथरूममधून ताब्यात घेतल्याचा आरोपही एका विद्यार्थिनीने केला.

पोलिसांकडून आपल्याला नेमके कुठे नेले जात आहे, याची माहिती दिली जात नव्हती. पोलिसांकडून धमकावण्यात येत होते. कोपरी पोलीस ठाण्यात नेल्यानंतर काँग्रेस नेत्यांचा फोन आल्यानंतर आपली सुटका करण्यात आली; अन्यथा नाशिकला सोडून देणार असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा विद्यार्थिनींनी केला.

“आम्हाला वॉशरूमलाही जाऊ दिले नाही, पाणीही दिले नाही. पोलीस व्हॅनमध्ये आमच्यासोबत एकही महिला पोलीस कर्मचारी नव्हती. आंदोलनस्थळी घेऊन जातो असे सांगण्यात आले; मात्र प्रत्यक्षात आम्हाला दुसरीकडे नेण्यात आले,” असा आरोपही विद्यार्थिनींनी केला.

“स्वच्छ पाणी, चांगले जेवण आणि आरोग्य सुविधा द्या”

आदिवासी विद्यार्थ्यांनी आश्रमशाळांमधील सुविधांचा मुद्दाही पुन्हा उपस्थित केला. आश्रमशाळांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही, जेवणाचा दर्जा निकृष्ट आहे, तसेच आरोग्याच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. सरकारकडे सातत्याने मागण्या करूनही केवळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

मुंबईत राहण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केलेल्या व्यवस्थेमुळे काँग्रेस कार्यालयात आश्रय घेतल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले. “मुख्यमंत्री महोदयांनी आमची राहण्याची व्यवस्था केली असती तर आम्ही तिथेच गेलो असतो,” असा टोला या विद्यार्थ्याने लगावला.या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत