शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील वकिलांच्या प्रतिष्ठेचा आणि संघटनेच्या नेतृत्वाचा निर्णायक क्षण ठरलेल्या निवडणुकीत अँड. उदय जयवंत सरोदे यांनी दमदार विजय मिळवत शिरूर तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. २३ जुलै २०२५ रोजी पार पडलेल्या या चुरशीच्या आणि बहुचर्चित निवडणुकीत त्यांनी आपल्या नेतृत्वक्षमतेची ठाम छाप सोडत वकिलांचा विश्वास संपादन करत अध्यक्षपदी विराजमान झाले आहे.
तालुक्यातील विविध भागांतून आलेल्या आणि संघटनेच्या कार्यात सक्रीय सहभागी असलेल्या वकिलांनी या निवडणुकीत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी नव्या कार्यकारिणीकडे आशेने पाहिले आहे. अध्यक्षपदासोबतच इतर पदांसाठी झालेल्या निवडणुकीतही सक्षम आणि अनुभवी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
नव्याने निवडून आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष: अँड. उदय जयवंत सरोदे
उपाध्यक्ष: अँड. प्रज्ञा पवार व अँड. संजय भुजबळ
सचिव: अँड. रोहीत पोटावळे,खजिनदार: अँड.विशाल शेंडगे,सदस्य: अँड.प्रतिभा पठारे,अँड. प्रणिता जोशी, अँड संदीप शेडकर,अँड. विवेक खांडरे,अँड. स्वप्नील शेलार यांची निवड झाली आहे.
निवडणुकीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अँड. सरोदे म्हणाले, “शिरूर तालुक्यातील वकिलांचे प्रश्न आणि त्यांचे न्याय हक्क यांचे प्रभावी संरक्षण, न्यायालयीन कामकाजातील अडथळे दूर करणे तसेच नव्या पिढीतील वकिलांना योग्य दिशा आणि संधी उपलब्ध करून देणे हे माझ्या कामाचे मुख्य केंद्रबिंदू राहील. संघटनेचा सर्वसामान्य सदस्यही या प्रवासात महत्त्वाचा भाग असणार आहे.”
अँड. उदय सरोदे हे गेली दोन दशके कायदा क्षेत्रात कार्यरत असून त्यांचा सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग आहे. आपल्या शांत, संयमी आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या कार्यशैलीमुळे त्यांनी वकिलांच्या मनात विश्वासाची जागा निर्माण केली आहे. त्यांचे नेतृत्व संघटनेला नव्या उंचीवर नेईल, असा विश्वास तालुक्यातील वकिलांमधून व्यक्त केला जात आहे.
शिरूर तालुका वकील संघटना ही न्यायप्रवेशाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची संस्था असून तिच्या माध्यमातून स्थानिक न्याय व्यवस्थेतील विविध प्रश्न मार्गी लावण्याचे कार्य सातत्याने होत आले आहे. नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीकडूनही अधिक परिणामकारक आणि गतिमान कामकाज करण्याचीअपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.