पोलिसांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे हरवलेला मोबाईल सापडल्याने त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

ट्रॅफिक पोलीस राजेंद्र वाघमोडे यांचे स्तुत्य कार्य

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बी.जे. कॉर्नर परिसरात वाहतूक नियमन करत असताना ट्रॅफिक पोलिसांनी दाखवलेली सजगता व प्रामाणिकपणा याचे कौतुक होत आहे. शिरूर पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक पोलीस राजेंद्र वाघमोडे यांनी रस्त्यावर सापडलेला मोबाईल फोन योग्य तपासणी करून तो प्रत्यक्ष मालकाच्या हाती परत करताना मानवतेचे उत्तम उदाहरण घालून दिले.

सदर मोबाईल एका गवंडी काम करणाऱ्या गरीब मजुराचा होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कष्ट करून पोट भरणाऱ्या या मजुरासाठी तो मोबाईल म्हणजे संपर्काचे एकमेव साधन होते. मोबाईल हरवल्यानंतर त्याच्यावर संकटाचे सावट होते. मात्र, ट्रॅफिक पोलीस वाघमोडे यांनी रस्त्यावर सापडलेला मोबाईल आपल्या ताब्यात घेत त्याची तातडीने चौकशी करून संबंधित मालकाचा शोध घेतला आणि मोबाईल त्याच्या ताब्यात दिला.

मोबाईल मिळाल्यावर मजुराच्या डोळ्यात अश्रू तरळले. “मी खुप गरीब माणूस आहे. हा मोबाईल म्हणजे माझ्या मुलांशी, नातेवाईकांशी संपर्क ठेवण्याचेच साधन होते. तो परत मिळवणे माझ्यासाठी स्वप्नवत होते,” असे सांगताना त्याने पोलिसांचे आभार मानले.

या घटनेमुळे शिरूर पोलीस दलातील ट्रॅफिक विभागाची प्रतिमा आणखी उजळली आहे. ट्रॅफिक पोलीस राजेंद्र वाघमोडे यांच्या प्रामाणिक आणि सहृदय वृत्तीमुळे नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेबद्दलचा विश्वास अधिक बळकट झाला आहे. यावेळी सोबत पोलीस अमलदार आप्पासाहेब कदम, सचिन गोरे हे उपस्थित होते.

या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांमुळेच “पोलीस फक्त कायदा रक्षक नव्हे, तर समाजाचे हितचिंतक सुद्धा आहेत” हे पुन्हा सिद्ध झाले आहे.