ऐन शालेय प्रवेशाच्या काळात ‘महा ऑनलाइन’ सर्व्हरमध्ये मोठ्या चुका

मुख्य बातम्या शिरूर तालुका

नागरीकांना व सेतू केंद्रचालकांना होतोय मनस्ताप 

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यासह संपुर्ण महाराष्ट्रभर नागरी सुविधा केंद्र व महा-ई-सेवा केंद्र मागील काही दिवसांपासून ‘महा ऑनलाइन’ (महा आयटी) प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या विविध सेवा पुरवठ्यात वारंवार अडथळे निर्माण होत आहे.

१० एप्रिल २०२५ पासून ऑनलाइन सर्व्हर सतत बंद पडत असल्याने सेवा देण्यात अडचणी येत आहेत. सर्व्हर डाऊनमुळे आवश्यक प्रमाणपत्रे व इतर प्रक्रिया वेळेवर पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. काही वेळा लॉगिन करताना तांत्रिक त्रुटीमुळे काम थांबत आहे.

तसेच, भाषा बदलताना किंवा सर्टिफिकेट जनरेशन दरम्यान सुद्धा समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सेवा प्रक्रियेवर परिणाम होत असून नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होत आहे. या समस्यांमुळे नागरिक सुविधा केंद्र व महा-ई सेवा केंद्रातील कामकाज ठप्प होण्याच्या स्थितीत आले आहे. सेतू केंद्रात दाखला तयार करताना लाभार्थ्याच्या नावे दाखला तयार करताना दाखला तयार होतो परंतु तो मंजूर झाल्यानंतर दुसऱ्याच्या नावाने पोर्टलला तो दिसून येतो त्यामुळे सर्व सेतू केंद्र चालक व नागरिक त्रस्त झाले असून लवकरात लवकर सर्व्हरमधील दोष ( बिघाड ) दूर करण्याची मागणी सर्व सेतू केंद्र चालक व महा ई सेवा केंद्र चालक यांनी केली आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन व तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी महाराष्ट्रभरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.