शिरुरच्या माजी नगरसेविका ज्योती लोखंडे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश; अजुनही काहीजण इच्छुक

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. महायुतीपेक्षा जास्त जागा जिंकल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षात कार्यकर्त्यांनी इनकमिंग सुरु केले असुन शिरुर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका ज्योती लोखंडे यांनी आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. तसेच डॉ अमोल कोल्हे यांच्या विजयामुळे अनेकजण पुन्हा राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षात येण्यास इच्छुक असल्याचीही सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

काही दिवसांपुर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पाडत भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांची साथ देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे शिरुर तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आमदार अशोक पवार हे एकाकी पडले. तर भाजपाच्या काही नेत्यांनी अजित पवार यांची साथ देत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

तसेच लोकसभा निवडणुकीपुर्वी शिरुर शहरातील अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला. तसेच सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत महिलांचा मोठा मेळावा शिरुर शहरात घेण्यात आला. त्यामुळे साहजिकच शिरुरमध्ये अजित पवार यांची ताकत वाढली. परंतु याउलट राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात मात्र आमदार अशोक पवार यांच्या व्यतिरिक्त कोणताही बडा नेता उरला नाही. त्यामुळे आमदार पवार यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर प्रचार यंत्रणा राबविली.

शिरुर शहरासह शिरुर ग्रामीणमध्ये महिला कार्यकर्त्यांनी लढविली खिंड…

शिरुर तालुक्यात राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतर शिरुर शहरासह शिरुर ग्रामीण मध्ये आमदार अशोक पवार आणि त्यांच्या पत्नी सुजाता पवार यांच्या नेतृत्वाखाली शिरुर तालुक्यातील सर्वसामान्य महिला पदाधिकाऱ्यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन लोकसभेच्या निवडणुकीत सहभागी होत डॉ अमोल कोल्हे यांचा प्रचार केला. विशेष म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवता स्वखर्चाने या महिला पदाधिकाऱ्यांनी शिरुर शहर तसेच शिरुर ग्रामीण, बाबुरावनगर या भागात डॉ कोल्हे यांचा जोरदार प्रचार केला. घरोघरी जाऊन लोकांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ध्येय धोरणे समजावून सांगितली. त्यामुळे शिरुर शहर आणि शिरुर ग्रामीण मध्ये डॉ कोल्हे यांना जे मताधिक्य मिळाले त्यात महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाही खारीचा वाटा आहे.

रामलिंग महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिरुर तालुका महिलाध्यक्षा विद्या भुजबळ शिरुर शहर महिलाध्यक्षा स्मिता कवाद, युवती तालुकाध्यक्षा संगीता शेवाळे, युवती शहराध्यक्षा गीता आढाव, उषा चव्हाण, राणी शिंदे, अनिता गवारे, दिप्ती जोशी, छाया हारदे, दिपाली आंबरे, मनीषा तरटे, बेबी शितोळे, मनीषा दळवी, निर्मला ढोकळे, रुपाली बोर्डे, वर्षा जगधने, निर्मला ढोकले, शीतल शर्मा, सारिका विर्सेव, पल्लवी चाबुकस्वार, मंगल गायकवाड, छाया पाडळे, प्रतीक्षा पवार, ज्योती जगताप, जयश्री थेऊरकर, पुनम शिंदे, संगीता रोकडे, वैशाली बांगर, कल्पना पुंडे, रश्मी गावडे, नलिनी भोसले, राजश्री ढमढेरे, सुनीता कांबळे, मिनल रेपाळे, सरिता खेडकर, कल्पना जेऊघाले, मनीषा गरुड, छाया आल्हाट या महिला कार्यकर्त्यांनी प्रचारात सक्रीय सहभाग घेत डॉ अमोल कोल्हे यांच्या विजयात खारीचा वाटा उचलला.